कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे. महाराष्ट्रही हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगतीचा ठसा उमटवत आहे. कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहेत. कॅनडा येथील शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन, कॅनडातील न्यू ब्रन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट व शिष्टमंडळासाठी आयोजित स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, बृहन्मुंबई आयुक्त भूषण गगराणी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे सचिव पी अन्बळगण आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. तसेच नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय 'एज्युसिटी' निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी विदेशातील नामांकित विद्यापीठे आपले शैक्षणिक दालने उघडणार आहेत. आतापर्यंत पाच विद्यापीठांना ' लेटर ऑफ इन्टेंट' देखील देण्यात आले आहे. विद्यापीठांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन काम करीत आहे. महाराष्ट्र हे ६० टक्के २७ वर्ष वयापर्यंत लोकसंख्या असलेले राज्य आहे. कॅनडा येथे राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे कॅनडा येथील विद्यापीठांनी महाराष्ट्रात येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय 'एज्युसिटी' मध्ये आपली शैक्षणिक दालने उघडावी.


कॅनडा कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन यामध्ये मोठे काम करीत आहे. कॅनेडियन शासनाने यासाठी व्यवस्था उभ्या केल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी डाटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, स्टार्टअप आदी क्षेत्रात कार्य करीत आहे. नुकतीच कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती यशस्वी वैचारिक मंथन करणाऱ्या परिषदेचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आले. कृषी विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून डिजिटल व्यासपीठावर आणण्यात आले आहे. याकरिता राज्य शासन महाविस्तार उपक्रमही राबवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे. महाराष्ट्र पण त्याला अपवाद नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


कॅनडा शिष्टमंडळाचा भारत दौरा आणि मुंबईतील हा कार्यक्रम आपल्या द्विपक्षीय संबंधांची खरी सुरुवात आहे. भविष्यातही कॅनडाने अशाच प्रकारे भारत आणि महाराष्ट्राला भेट देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना मोठा इतिहास असल्याचे सांगत भविष्यातही हे सहकार्य असेच दृढ होत राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच कॅनडाच्या न्यू ब्रन्सविकच्या राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट यांनी महाराष्ट्र आणि न्यू ब्रन्सवीकमधील सहकार्य आणि संबंधाविषयी भाष्य केले.


उद्योग विभागाचे सचिव पी अन्बळगण यांनी राज्य शासनाच्या उद्योग धरण आणि ' इज ऑफ डूइंग बिझनेस' विषयी सादरीकरण केले. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांविषयी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एज्युसिटी, मेडिसिटी एरोसिटी, खारघर येथील आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र याविषयी सादरीकरण केले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी नवी मुंबई येथे विदेशी विद्यापीठांसाठी उभारण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा व राज्यातील उच्च शिक्षणाच्या परिस्थितीविषयी सादरीकरण केले. तसेच मित्रा संस्थेच्या वतीने राज्यातील विकासाच्या परिवर्तनाविषयी चित्रफित दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी केले. कार्यक्रमाला कॅनडियन शिष्टमंडळातील प्रतिनिधी, विद्यापीठांचे प्रतिनिधी, भारतीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योजक, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

कोकणच्या विकासाची नवी नांदी

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

BMC : मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मुंबई : जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून गौरवणार; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई: ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना

मुंबईत उभारणार मल्टी-मॉडेल टनेल; रस्ते वाहतुकीसोबतच सेवा सुविधांच्या जाळ्यांसाठी असेल स्वतंत्र मार्ग

मुंबई: वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर प्रभावी

मुंबईतील फोर्ट परिसरात आग; बाबेल हॉटेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर...

मुंबई: मुंबईतील फोर्ट परिसरात आग लागली. ही आग ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांवर लागली. तसेच ती हॉटेल इमारतीच्या