IDFC FIRST Bank: बँकिंग क्षेत्रात ५९० कोटींचा घोटाळा; माजी मॅनेजरने बायकोच्या जोडीने मारला बँकेच्या तिजोरीवर डल्ला

मुंबई: बँकिंग क्षेत्रात सध्या एका मोठ्या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत तब्बल ५९० कोटी रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड त्या शाखेचा माजी मॅनेजर रिभव ऋषी हा आहे.


या घोटाळ्याचा तपास करताना हरियाणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आतापर्यंत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये माजी मॅनेजर रिभव ऋषी, माजी रिलेशनशिप मॅनेजर अभय, रिभवची पत्नी स्वाती सिंगला आणि तिचा भाऊ अभिषेक सिंगला यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा धाडसी पण तितकाच धक्कादायक कट रचला होता.



५९० कोटींचा घोटाळा



या घोटाळ्याची वाच्यता तेव्हा झाली जेव्हा हरियाणा सरकारच्या एका विभागाने आपले खाते बंद करून त्यातील पैसे दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्याची विनंती आयडीएफसी फर्स्ट बँकेला केली. जेव्हा बँक अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड तपासले, तेव्हा त्यांना कागदोपत्री असलेली रक्कम आणि प्रत्यक्षात खात्यात शिल्लक असलेली रक्कम यामध्ये मोठी तफावत दिसून आली.


एका खात्याचा तपास सुरू असतानाच हरियाणा सरकारच्या इतर संलग्न खात्यांमध्येही अशाच प्रकारच्या गडबडी असल्याचे बँकेच्या लक्षात आले. यानंतर बँकेने स्वतःहून या प्रकरणाची माहिती नियामक संस्थांना दिली आणि तपास यंत्रणांना पाचारण केले.



कुटुंबाच्या नावे कंपनी काढून वळवले सरकारी पैसे



तपासादरम्यान असे समोर आले की, रिभव आणि अभय या दोघांनी सुमारे ६ महिने आधीच बँकेचा राजीनामा दिला होता. त्यांनी हरियाणा सरकारच्या खात्यांमधील पैसे स्वास्तिक देश प्रोजेक्ट्स नावाच्या कंपनीच्या खात्यात वळवले होते. ही कंपनी रिभवची पत्नी स्वाती आणि तिचा भाऊ अभिषेक यांच्या मालकीची आहे.


या कंपनीमध्ये स्वातीचे ७५ टक्के आणि अभिषेकचे २५ टक्के शेअर्स आहेत. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे ३०० कोटी रुपये इतरत्र वळवण्यात आले. विशेष म्हणजे चंदीगडमधील बँक आणि हरियाणातील सरकारी खाती असताना हे पैसे मोहाली येथील एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेत वळवण्यात आले होते. वेगवेगळ्या राज्यांच्या सीमांचा फायदा घेत हा व्यवहार लपवण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला होता.



बँकेची तत्परता



या संपूर्ण प्रकरणात आयडीएफसी फर्स्ट बँकेने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असताना आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही बँकेने हरियाणा सरकारच्या संबंधित विभागांचे नुकसान होऊ दिले नाही. बँकेने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या 'कस्टमर फर्स्ट' या तत्त्वाचे पालन करतो. त्यामुळे तपासाची वाट न पाहता हरियाणा सरकारच्या विभागांनी दावा केलेली १०० टक्के रक्कम म्हणजेच व्याजासह सुमारे ५८३ कोटी रुपये बँकेने परत केले आहेत.


हरियाणा सरकारने देखील बँकेच्या या तत्परतेचे आणि व्यावसायिक भूमिकेचे कौतुक केले आहे. सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपींना कोर्टात हजर केले जाणार असून या कटात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध एसीबी घेत आहे.

Comments
Add Comment

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू