Saturday, February 21, 2026

दिवस आणि रात्र लहान-मोठे का असतात?

दिवस आणि रात्र लहान-मोठे का असतात?

कथा : प्रा. देवबा पाटील

सीता व नीता रोजच संध्याकाळी शाळा सुटल्यावर, घरी आल्यावर त्यांच्या प्राध्यापक मावशीला वेगवेगळी माहिती विचारात असत. आजही त्यांनी विचारण्यास सुरुवात केली.

“मावशी हे दिवस व रात्र सारखेच १२ तासांचे का नसतात?” नीताने विचारले. “हो मावशी, खरेच ते लहान-मोठे का असतात?” सीताने नीताचे समर्थन केले.

“सूर्य दररोज क्षितिजावरच्या एकाच ठिकाणी उगवत नाही तसेच एकाच ठिकाणी मावळतही नाही. ज्या दिशेला सूर्य उगवतो ती पूर्व आणि जिकडे तो मावळतो ती पश्चिम. ही तंतोतंत स्थिती सूर्याच्या उत्तरायण वा दक्षिणायन प्रवेशारंभीच म्हणजे फक्त २१ मार्च आणि २१ सप्टेंबरलाच असते म्हणून या दिवशी दिवस-रात्र हे बरोबर १२/१२ तासांचे असतात. पृथ्वी जर किंचितशी एका दिशेस झुकलेली म्हणजे कलती नसती तर पृथ्वीवर वर्षभर १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र राहिली असती; परंतु पृथ्वीच्या कलत्या आसामुळे तिचा सर्व भाग सूर्याकडे सारख्या कालावधीसाठी येत नसतो. जो भाग ज्यावेळी सूर्याकडे जास्त झुकलेला असतो व सूर्यासमोर जास्त कालावधीसाठी येतो त्या भागावर त्यावेळी सूर्यप्रकाश जास्त वेळ पडतो व तेथे दिवस मोठा असतो. त्याचवेळी त्या भागाच्या मागील भागावर रात्र लहान असते. आपल्याकडे उन्हाळ्यात ही स्थिती येते. २१ मार्चला दिवस व रात्र हे समसमान असतात. नंतर रोज हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि २१ जून रोजी दिवस सर्वात मोठा असतो नि रात्र सर्वात लहान असते. या दिवसाला उन्हाळा आयन दिवस असे म्हणतात. या दिवशी दिवस सव्वातेरा तासांचा व रात्र पावणेअकरा तासांची असते. तसेच २१ सप्टेंबर रोजी पुन्हा दिवस व रात्र हे समसमान असतात. त्यानंतर दररोज दिवस हळूहळू लहान होत जातो आणि २१ डिसेंबर रोजी दिवस सर्वात लहान असतो नि रात्र सर्वात मोठी असते.

या दिवसाला हिवाळा आयन दिवस असे म्हणतात. या दिवशी रात्र सव्वातेरा तासांची व दिवस पावणेअकरा तासांचा असतो. बरोबर ६ महिन्यांनी हे बदल पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या लंबवर्तुळाकार परिभ्रमणामुळे घडत असतात. पृथ्वीच्या ध्रुवांवर सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते, ती पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळेच. मावशीने सविस्तर सांगितले.

“म्हणूनच मावशी, आपल्याकडे उन्हाळ्यात जास्त तापते.” सीता म्हणाली. मावशी म्हणाली, “हो, खरे आहे ते. जो भाग सूर्याकडे असतो तेथे सूर्याचे उष्ण किरण सरळ पडतात. तसेच तो भाग सूर्यासमोर जास्त वेळ राहतो. या दोन्ही कारणांमुळे त्या भागाला सूर्याची उष्णता जास्त मिळते. म्हणून तेथे जास्त तापते व तेथे उन्हाळा असतो.” “आता आले लक्षात. याच्या उलट हिवाळ्यात थंडी जास्त का पडते ते” नीता म्हणाली.

“हो, बरोबर आहे. याउलट जो भाग हा सूर्यापासून दूर असतो त्यावर सूर्यकिरणं तिरपे पडत असल्याने तेथे प्रकाश कमी पोहोचतो. त्यामुळे तेथे हवेत थंडी वाढत जाते आणि त्या भागात हिवाळा सुरू होतो. तसेच तो भाग सूर्यापासून दूर असल्याने जास्त वेळ अंधारात असतो म्हणून तेथे दिवस लहान, तर रात्र मोठी असते. आपल्याकडे हिवाळ्यात ही स्थिती येते. समजलं का?” मावशीने विचारले. “हो, मावशी! आम्हाला सगळं छान समजलं.” दोघींनीही आनंदाने उत्तर दिले.

Comments
Add Comment