व्हिलन

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


अचानक एखादी बातमी वाचायला मिळते. ती बातमी अख्खा दिवस तुमच्या डोक्यात घोळत राहते. ती बातमी कधी खूप आनंददायी असते, कधी खूप दुःखाची, कधी खूप वैचारिक दिशा देणारी असते, तर कधी खरे तर त्यात फारसे तथ्य नसते, पण ती बातमी तुम्हाला अस्वस्थ करते, विचार करायला लावते.


आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडून पाच वर्षे उलटली होती. रोजची कटकट नको म्हणून रणजीतने कायमस्वरूपी एक रक्कम वृद्धाश्रमाला दिली होती, त्यामुळे परत परत तसा त्याचा वृद्धाश्रमाशी संबंध राहिला नव्हता. त्याने कोणताही संपर्क क्रमांक वृद्धाश्रमाला दिला नाही आणि कोणत्याही कामासाठी कधी फोनही करण्याची किंवा त्याला शोधण्याची त्यांना गरज नाही, असेही सुचवले होते. धार्मिक वृत्तीच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंदिराबाहेर रणजीत भिकाऱ्यांना मिठाईच्या पुड्यातून लाडू वाटत असताना अचानक एका बाईकडे पाहत थबकला. ती चक्क त्याची आई होती. तरीही त्यांनी खात्री करण्यासाठी ‘आई...’ असे संबोधले. नजर झुकवून हात पुढे करून बसलेल्या त्या बाईने नजर उचलून वर पाहिले आणि तिच्या तोंडातून नकळतपणे शब्द बाहेर पडले, ‘रणजीत बेटा!’


आता पुढे या कथेविषयी आपल्याला फार जाणून घेण्याची उत्सुकता निश्चितच निर्माण झाली असेल, तर ती थोडीशी शमवते. काही कारणास्तव वृद्धाश्रम बंद पडले. दोघेही काही दिवस इकडेतिकडे रस्त्यावरच राहिले. आणि दरम्यान रणजीतचे वडील हे जग सोडून गेले. तेव्हापासून रणजीतची आई या मंदिराबाहेरच्या भिकाऱ्यांसोबतच आयुष्य रेटत होती.


बाकी रणजीतने आपल्या आईला घरी नेले का किंवा तिची दुसऱ्या वृद्धाश्रमात रवानगी केली की ओळख न वाढवता तिथून निघून गेला, या प्रश्नाच्या खोलात न जाता अशी घटना घडली आणि ती वृत्तपत्राची बातमी झाली, एवढेच मला सांगायचे आहे.

अशीच आणखी एक घटना म्हणजे एक कलेक्टर आपल्या आलिशान गाडीतून जात असताना सिग्नलला गाडी थांबते आणि बाहेर कोपऱ्यावर एक फाटक्या कपड्यातला माणूस भिंतीवर कठीण गणित सोडवताना दिसतो. त्याला पाहून काही कॉलेजचे विद्यार्थी हसत असतात. त्याची टर उडवत असतात वगैरे. कलेक्टरच्या लक्षात येते की हा माणूस जे विटकरीने भिंतीवर लिहीत आहे ते अत्यंत कठीण गणित आहे आणि तो ते व्यवस्थित सोडवत आहे. केवळ कुतूहल म्हणून तो गाडीतून उतरतो आणि त्या फाटक्या कपड्यातल्या माणसाच्या जवळ जातो, त्याचा चेहरा पाहतो आणि आश्चर्यचकित होतो कारण ते त्याचे गणिताचे सर असतात. कॉलेजमध्ये त्यांनी त्याला गणित उत्तम प्रकारे शिकवलेले असते. हजारो विद्यार्थी घडवलेले असतात. त्या कलेक्टरकडे ऐकीव माहिती असते की सरांची पत्नी आणि मुलाचे अपघाती निधन झाल्यामुळे सर वेडे झाले आहेत आणि ते कोणालाही कित्येक दिवसांत सापडलेले नाहीत. तो त्यांना आपल्या घरी घेऊन येतो आणि त्यांच्या सोबतीला एक माणूस ठेवून त्यांना व्यवस्थित सांभाळतो. साधारण पाच वर्षे ते जगतात ते केवळ गणितामुळेच! कारण कलेक्टर रोज ऑफिसमधून आल्यावर त्यांच्याकडून गणित शिकून घ्यायचा. गणितात एकही चूक न करणारा हा माणूस मात्र स्वतःच्या आयुष्यातील सर्व घटना पूर्णपणे विसरून गेलेला असतो अगदी स्वतःचे नावसुद्धा! रस्त्यावर फाटक्या कपड्यात फिरणारी माणसे जन्माने भिकारी नसतातच, तर ती परिस्थितीने भिकारी होतात, लाचार होतात, वेडी होतात.

माझ्या सासूबाई ठाणा मेंटल हॉस्पिटलमध्ये दहा वर्षे डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी मला सांगितलेली एक घटना आठवली. असाच आयआयटीमधून इंजिनीअर झालेला एक पन्नाशी ओलांडलेला माणूस वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला होता. तो सासूबाईंशी वैचारिक गप्पा मारायचा. अगदी आपण सर्वसामान्य माणसे असतो त्याप्रमाणे तो वागायचा-बोलायचा आणि व्यवस्थित खायचा-प्यायचा. फक्त आठवडा दीड आठवड्यातून एकदा त्याला वेड्याचा झटका यायचा आणि मग तो स्वतःचेच कपडे फाड, मिळेल ती वस्तू फेकून मार, एखाद्याच्या अंगावर धावून जा असे करत वेड्यासारखा वागायचा. त्या काळात त्याला आवरणे चार माणसांनाही झेपायचे नाही. अशा वेळेस त्याला बेडला बांधून ठेवले जायचे. सासूबाई सांगायच्या की वेडी माणसे कायमस्वरूपी वेडी नसतात, फक्त काही क्षणांसाठी त्यांना वेड्यांचा झटका येतो. असो...


एका अपरिचित रुग्णाविषयी बोलताना त्यादिवशी सासूबाईंच्या डोळ्यांत मी पाणी तरळताना पाहिले. एकीकडे आपल्याच माणसांना घराबाहेर काढणारी माणसे आहेत आणि दुसरीकडे संवेदनशील माणसे जी अजूनही माणुसकी टिकवून ठेवून आहेत. प्रत्येक माणसाला मनात असूनही वरील उदाहरणातील कलेक्टरसारखे हिरो होता येईल असे नाही; परंतु आता आपल्या हातात निश्चितपणे एवढेच आहे की, आपल्याच माणसांच्या संबंधात आपण इतके वाईट वागू नये की ती वृत्तपत्राची सामाईक बातमी होईल, ज्यात आपल्याला व्हिलन
ठरवले जाईल!


pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment

पेरावे तसे उगवते

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर पेरावे तसे उगवते” ही एक जुनी, पण तितकीच सत्य आणि प्रभावी मराठी म्हण आहे. या

जिद्द

कथा : रमेश तांबे रस्त्याच्या कडेला एक शाळकरी मुलगा वजन काटा घेऊन बसला होता. काट्यावर दोन रुपये असा कागद लावला

दिवस आणि रात्र लहान-मोठे का असतात?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता रोजच संध्याकाळी शाळा सुटल्यावर, घरी आल्यावर त्यांच्या प्राध्यापक मावशीला

मोठी त्याची सावली

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “मोठी त्याची सावली” म्हणजे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, कार्य, विचार

डबक्यातला बेडूक

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ माझ्या माहितीप्रमाणे आपण सर्वांनीच कधीतरी आपल्या घरात किंवा शाळेत एक कथा ऐकलेली

कलेचे मूल्य

कथा : रमेश तांबे हजार बाराशे वस्तीचं एक गाव होतं. गाव तसं सधन होतं. त्यांना त्यांच्या गावातल्या एका पुढाऱ्याचा