बीड: राज्यात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरू झाली आहे. याच दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. बीड तालुक्यातील कुर्ला येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चक्क मंडपात बसून पेपर द्यावा लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना आता या मंडपातील उकाड्यात बसून दहावीची परीक्षा द्यावी लागणार आहे.या प्रकारावर पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमका प्रकार काय?
बीड जिल्ह्यातील कुर्ला येथे दहावीचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. पण या केंद्रावर उपलब्ध असलेल्या खोल्यांच्या तुलनेत परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितलं जातं आहे. या वाढीव संख्येला सामावून घेण्यासाठी प्रशासनाने खोल्यांची पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी चक्क शाळेच्या मैदानात कापडी मंडप उभारला. या मंडपातच बाकडे टाकून विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिना संपत आला असून मार्चच्या सुरुवातीलाच बीडमध्ये उन्हाचा पारा चढू लागला आहे. अशा रणरणत्या उन्हात कापडी मंडपाखाली बसून तीन तास पेपर लिहिणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कठीण जाणार आहे. उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, एखादा विद्यार्थी उष्माघातामुळे आजारी पडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
बारावीची परीक्षा झाल्यानंतर दहावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचा दावा प्रशासन करत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र कुर्ला केंद्रावर पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांसाठी योग्य व्यवस्था का करण्यात आली नाही? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.







