Tuesday, February 17, 2026

Salim Khan : सलीम खान यांची प्रकृती खालावली; आयसीयूमध्ये उपचार सुरू, सलमान खान तातडीने रुग्णालयात दाखल

Salim Khan : सलीम खान यांची प्रकृती खालावली; आयसीयूमध्ये उपचार सुरू, सलमान खान तातडीने रुग्णालयात दाखल
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज पटकथालेखक आणि अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान (Saleem Khan) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर आयसीयू (ICU) मध्ये उपचार सुरू आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर पापाराझी विरल भयानीने रुग्णालयाबाहेरील एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये रुग्णालयाबाहेरील हालचाली दिसून येत आहेत. वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळताच अभिनेता सलमान खान आपले सर्व काम सोडून तडकाफडकी लीलावती रुग्णालयात पोहोचला. यावेळी सलमानच्या चेहऱ्यावर वडिलांच्या प्रकृतीबद्दलची चिंता स्पष्टपणे जाणवत होती. सलीम खान यांना नेमका कोणता त्रास होत आहे, याबाबत खान कुटुंबीयांकडून किंवा डॉक्टरांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यांचे निवासस्थान असलेल्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट'पासून जवळच हे रुग्णालय असल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे सोपे झाले आहे. सध्या संपूर्ण सिनेसृष्टी आणि त्यांचे चाहते सलीम खान यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असून, कुटुंबीयांकडून हेल्थ अपडेटची प्रतीक्षा केली जात आहे.

नुकताच साजरा केला होता ९० वा वाढदिवस

भारतीय चित्रपटसृष्टीला 'शोले', 'जंजीर' आणि 'दीवार'सारखे अजरामर चित्रपट देणारे प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. बॉलिवूडमध्ये 'सलीम-जावेद' या जोडीने जो इतिहास रचला, त्याचे सलीम खान हे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. गेल्या काही काळापासून ते कौटुंबिक सोहळ्यांमध्ये आनंदाने सहभागी होताना दिसत होते. विशेष म्हणजे, नुकताच त्यांनी आपल्या लग्नाचा ६१ वा वाढदिवस उत्साहात साजरा केला होता, परंतु आता त्यांच्या प्रकृतीची बातमी आल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सलीम खान यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच चर्चेत राहिले आहे. १९६४ मध्ये त्यांनी सलमा खान यांच्याशी विवाह केला, ज्यांच्यापासून त्यांना सलमान, अरबाज, सोहैल आणि अलवीरा ही चार मुले आहेत. त्यानंतर १९८१ मध्ये त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरे लग्न केले आणि अर्पिताला दत्तक घेऊन आपल्या कुटुंबाचा विस्तार केला. गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी सलीम खान यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली. मात्र, त्यांच्या या वाढदिवसाला दु:खाची किनार होती, कारण नेमक्या त्याच दिवशी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले होते. सध्या सलीम खान यांना नेमका काय त्रास होत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खान कुटुंबाने याबद्दल कमालीची गुप्तता पाळली असून, चाहते आता अधिकृत 'हेल्थ अपडेट'ची प्रतीक्षा करत आहेत. वडीलधाऱ्या सलीम खान यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी सोशल मीडियावर प्रार्थनांचा ओघ सुरू झाला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >