Sunday, April 12, 2026
Nari Shakti Vandan

इराण-इस्त्रायल संघर्षानंतर ५२ हजारांहून अधिक भारतीय मायदेशी

इराण-इस्त्रायल संघर्षानंतर ५२ हजारांहून अधिक भारतीय मायदेशी

नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल संघर्षानंतर पश्चिम आशियातील काही देशांमध्ये हवाई क्षेत्र अंशतः पुन्हा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ५२ हजारांहून अधिक भारतीय नागरिक स्वदेशात परतले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की पश्चिम आशियातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून तेथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की त्या प्रदेशातील भारतीय दूतावासांकडून नागरिकांसाठी नियमित सूचना (ऍडव्हायजरी) जारी केली जात आहे. तसेच भारतीयांच्या मदतीसाठी २४x७हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षा आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देते आणि या भागातील गरजू भारतीयांना मदत करण्यासाठी संबंधित देशांच्या सरकारांशी सतत संपर्कात आहे.मंत्रालयाने सर्व भारतीय नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे तसेच भारतीय दूतावासांकडून जारी करण्यात आलेल्या सल्ल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

युद्ध सुरू झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पुन्हा व्यावसायिक उड्डाणे सुरू केली आहेत. या उड्डाणांचा फायदा घेत आतापर्यंत ५२ हजारांपेक्षा जास्त भारतीयांनी स्वदेश गाठले. भारतीय विमान कंपन्यांद्वारे १ ते ७ मार्च दरम्यान ३२ हजार १०७ प्रवाशांनी प्रवास केला असून पुढील काही दिवसांत आणखी उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे.

संकटग्रस्त देशांमधील भारतीय दूतावासांनी २४ तास नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) सुरू केले असून तेथून नागरिकांना तात्काळ माहिती आणि आवश्यक मदत दिली जात आहे. केंद्र सरकारने भारतीयांना इराणी आणि प्रभावित भागांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यात वाढत्या तणावामुळे तसेच आखाती देशांच्या हवाई क्षेत्रावर परिणाम झाल्याने हवाई तिकिटांच्या दरांमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र परतू इच्छिणाऱ्या नागरिकांना परवडणारे आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी भारत सरकार विमान कंपन्यांशी संपर्कात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा