मीनाक्षी जगदाळे
आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात मानवी नातेसंबंधांची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी लग्न किंवा मैत्री फारफार तर प्रेम प्रकरण या मुख्य चौकटी असायच्या, मात्र आता 'जेन-झी' (Gen-Z) १९९८ ते २०१२ च्या दरम्यान जन्माला आलेल्या मुलांना आपण जेन-झी म्हणतो आणि 'मिलेनियल्स' (Millennials) म्हणजेच ज्या मुलांचा जन्म १९८३ ते १९९८ या दरम्यान झाला आहे ती पिढी. या पिढीने नात्यांना अनेक नवनवीन पैलू दिले आहेत. आजच्या काळात प्रचलित असलेल्या नात्यांच्या काही नवीन संकल्पना या लेखामार्फत जाणून घेणार आहोत.
सद्या प्रचलित असलेले नात्याचं एक नाव म्हणजे सिच्युएशनशिप. हे सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेले नाते आहे. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये मैत्रीपेक्षा जास्त पण प्रेमाच्या अधिकृत कबुलीपेक्षा कमी असं नातं असतं, त्याला 'सिच्युएशनशिप' म्हणतात. या नात्याचं वैशिष्ट्य म्हणजे यात फिरणं, गप्पा मारणं आणि शारीरिक जवळीक असते, पण "आपण नक्की एकमेकांचे कोण आहोत?" याचे स्पष्ट उत्तर नसते. यात कोणतीही कमिटमेंट नसते. कोणतेही वचन किंवा एकमेकांसाठी काही करण्याची बांधिलकी नसते. सगळ्यांना हा प्रकार आरामदायी वाटतो कारण जबाबदारीचं ओझं नसतं.
दुसरा प्रकार म्हणजे लिव्ह-इन रिलेशनशिप. खरंतर लग्नाआधी एकमेकांना पूर्णपणे समजून घेण्यासाठी एकत्र राहणे म्हणजे लिव्ह-इन. अनेकदा दोघांचीही लग्न झालेली असून, एकाचच लग्न झालेले असून, दोघेही घटस्फोटीत असून, किंवा दोघेही विधवा किंवा विधुर असून एकमेकांच्या मानसिक, भावनिक, शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी जर एकत्र राहत असतील तर त्याला लिव्ह इन रिलेशन शिप म्हटले जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे यात जोडीदार एकाच घरात राहतात, घरखर्च शेअर करतात, दोघे नोकरी व्यवसाय आपल्या पसंतीने करतात आणि पती-पत्नीप्रमाणे आयुष्य जगतात. यामुळे विवाहा आधी असे राहिल्यास भविष्यात लग्न करायचे की नाही, याचा निर्णय घेणे सोपे जाते, एकमेकांना ओळखायला मदत होते. अनेकदा आपल्या लग्न केलेल्या पती अथवा पत्नीला सोडून दुसऱ्याबरोबर एन्जॉय करण्यासाठी पण हा पर्याय निवडला जातो. पती-पत्नी विभक्त आहेत पण घटस्फोट होईपर्यंत दुसऱ्या जीवनसाथी सोबत राहण्यासाठी पण हा पर्याय निवडला जातो. काहीजण तर स्वतःचे वैवाहिक आयुष्य सुरु असतानाही दुसऱ्या स्त्री अथवा पुरुषासोबत विवाह बाह्य संबंध ठेवून लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहतात.
तिसरा प्रकार म्हणजे ओपन रिलेशनशिप. या नात्यात दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम तर करतात, पण त्यांनी परस्परांना इतर व्यक्तींशी शारीरिक किंवा भावनिक संबंध ठेवण्याची मुभा दिलेली असते. यात प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. जोडीदाराला लपवून काहीही केले जात नाही, सर्व काही सहमतीने घडते. गर्ल फ्रेंड बॉयफ्रेंड, अफेअरमध्ये असणारे जोडपे किंवा अगदी पती पत्नी सुद्धा आजकाल ओपन रिलेशन शिपला प्राधान्य देतात. लग्नानंतर होणारे वैवाहिक वाद , मुलांवर होणारे परिणाम टाळण्यासाठी, समाजातील प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी, घटस्फोट अथवा द्वितीय विवाह टाळण्यासाठी आजकाल अनेक जोडपी आपल्या जोडीदाराला त्याला जिथे वाटेल तिथे शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देतात. या मध्ये दोघांना पण माहिती असते की आपला जोडीदार कोणाबरोबर आहे, का आहे आणि त्यांच्यात कोणत्या पातळीपर्यंत संबंध आहेत. समजून उमजून ठरवून या पद्धतीने वैवाहिक नातेसंबंध टिकवले जातात.
हुक-अप कल्चर : आजकालच्या डेटिंग ॲप्समुळे हे प्रमाण वाढले आहे. यात केवळ शारीरिक आकर्षणापोटी किंवा आनंदासाठी दोन व्यक्ती एकत्र येतात. यात कोणत्याही प्रकारची भावनिक गुंतवणूक किंवा भविष्यातील बंधने नसतात. केवळ शारीरिक गरज भागविण्याच्या हेतूने, बदल अथवा मजा म्हणून हे संबंध ठेवलेले असतात. यात दोघांना एकमेकांशी पुरेशी ओळख सुद्धा नसते अथवा परत भेटू की नाही हे ही निश्चित नसतं.
प्लॅटॉनिक रिलेशनशिप : असे नाते जिथे दोन व्यक्तींमध्ये खूप प्रेम आणि ओढ असते, पण त्यात शारीरिक संबंधांना स्थान नसते. हे नाते पूर्णपणे मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर असते. यात निखळ मैत्री आणि एकमेकांबद्दल आदर असतो. अनेकदा विशिष्ट अध्यात्मिक संप्रदाय, समूह यातील सदस्य शिष्य या नात्याने म्हणजेच आत्मिक आणि अंतर्मनाच मिलन होऊन एकत्र आलेले दिसतात. त्यांच्यात असलेल्या नात्याला, आपुलकीला प्लॅटॉनिक नाते म्हणतात.
ब्रेडक्रंबिंग आणि घोस्टिंग: नातेसंबंधातील काही नकारात्मक प्रकार आहेत. ब्रेडक्रंबिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीला फक्त अधूनमधून मेसेजअथवा फोन करून आशा दाखवणे, कधीतरी भेटणे पण प्रत्यक्षात नातं पुढे न नेणे. थोडक्यात त्याला आपला होकार, नकार, प्रतिसादाचा प्रकार यावर काहीच तर्क लावता आला नाही पाहिजे असे वागवले जाते.
घोस्टिंग म्हणजे कोणतंही कारण न देता अचानक बोलणं बंद करणे आणि संपर्कातून गायब होणे. अनेकदा आपल्याशी नियमित बोलणारी, भेटणारी व्यक्ती आपल्याला टाळायला लागते, आपल्या मेसेज ला फोन ला उत्तर देणे बंद करते. आपल्याला त्या व्यक्ती कडून असे वागण्याचा काहीही अर्थ सांगितला जातं नाही अथवा कोणतेही समर्थन दिले जातं नाही. घोस्टिंग करणाऱ्या व्यक्तीला आपण कितीही आणि कोणत्याही माध्यमातून संपर्क करायचा प्रयत्न केला तरी आपल्याला कोणताही प्रतिसाद, समर्थन अथवा उत्तर मिळत नाही.
डिंक कपल संकल्पना ही अजून ऐक पद्धत सध्या तरुण पिढीमध्ये फोफावताना दिसते. डिंक कपल म्हणजे लग्न करायचं, एकत्र नांदायचं, भरपूर पगाराच्या नोकऱ्या करायच्या पण मुलबाळ होवू द्यायचे नाही. हे डिंक कपल स्वतःला कोणत्याही जबाबदारी मध्ये अडकवू इच्छित नसतात. आपण कामावलेल्या पैशावर आयुष्य एन्जॉय करायचं, मुक्त जगायचं या भावनेतून डिंक कपल संकल्पना उदयाला आलेली आहे.
आपल्या आजपर्यंत चालत आलेल्या पारंपरिक नातेसंबंध मधील या बदलांची कारणे काय? यावर विचार करणे अभिप्रेत आहे. सगळ्यांना उपलब्ध असलेले वैयक्तिक स्वातंत्र्य जसे की, आजची पिढी स्वतःच्या करिअरला आणि स्वातंत्र्याला जास्त महत्त्व देते. अगदी लग्नानंतर सुद्धा जास्त अपेक्षा, बंधन लोकांना नको आहेत. मोठ्या प्रमाणात झालेली डिजीटल क्रांती टिंडर, बंबल यांसारख्या ॲप्समुळे जोडीदार शोधणे आणि बदलणे सोपे झाले आहे. वैवाहिक नात्यांमध्ये वाढत असलेला तणाव, लैंगिक तथा शारीरिक सुखं आणि समाधानाच्या अफाट कल्पना आणि अपेक्षा, उद्योग व्यवसाय नौकरी शिक्षण यामुळे घराबाहेर, आपल्या गावा आणि शहराबाहेर राहावे लागण्याची परिस्थिती यातून आलेला एकटेपणा, योग्य वयात लग्न जमू न शकणे, शारीरिक गरजा आणि लग्नाचे वाढत चाललेले वय या सारख्या अनेक कारणांमुळे आजकाल नाते, भावना, एकनिष्ठपणा याची कमी झालेली किंमत, चगळवाद यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते.
जबाबदारीची भीती, अपेक्षांचे ओझे नको असणे, आयुष्य भरासाठी जोखीम स्वीकारायला मन तयार नसणे, यामुळे लग्नासारख्या मोठ्या जबाबदारीत अडकण्यापूर्वी लोक अनेक पर्याय पडताळून पाहू इच्छितात अथवा लग्नानंतर पण खूप तडजोड करत बसण्यापेक्षा मिळेल तो मार्ग स्वीकारून मूव्ह ऑन होतात.
आर्थिक स्वावलंबन हा देखील खूप मोठा घटक आहे ज्यामुळे नात्यांची समीकरण बदलत चालली आहेत. मुले आणि मुली दोघेही कमावते असल्याने कोणावरही अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.आपला पैसा कसा, कोणावर, किती आणि कोठे खर्च करायचा याचा निर्णय अत्यंत कमी वयात घेण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे युवा पिढी अधिक मोकळी सुटलेली दिसते.
नात्यांच्या या बदलत्या स्वरूपात एकीकडे स्वातंत्र्य आहे, तर दुसरीकडे भावनिक असुरक्षितता देखील आहे. जुन्या पिढीसाठी हे प्रकार धक्कादायक वाटू शकतात, मात्र नवीन पिढीसाठी हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीचा एक भाग आहेत. शेवटी नातं कोणत्याही नावाचं असो, त्यात विश्वास आणि संवाद असणं महत्वाचे आहे. इथून पुढे आपल्याला घरोघरी या प्रकारच्या विविध संकल्पना पाहायला मिळाल्या तरी त्या स्वीकारणे अपरिहार्य असणार आहे.