महापालिका अतिरिक्त आयुक्तांना पत्र पाठवून व्यक्त केले समाधान
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील काही प्रमुख पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात आल्यामुळे अनेक रस्ते व पदपथ फेरीवाला-मुक्त झाले असून नागरिकांना आता सुरक्षित, मोकळ्या व अडथळारहित मार्गाने चालण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सकारात्मक सुधारणांबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले आहे. विशेषत: दादर माहिम भागातील जनतेने महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांना पत्र तसेच निवेदन देत एकप्रकारे कौतूक आणि समाधान व्यक्त केले आहे.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन व अतिक्रमण निर्मूलन विभाग समन्वयाने आणि प्रभावीपणे कार्यरत आहेत. स्वच्छता मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी, नियमित निरीक्षण, क्षेत्रनिहाय विशेष पथकांची नियुक्ती, तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही यामुळे रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला आहे. यासोबतच पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी नियोजनबद्ध कारवाई, पोलीस व संबंधित विभागांशी समन्वय, तसेच पुनरावृत्ती टाळण्यासाठी सातत्यपूर्ण देखरेख राबविली जात आहे. या सर्व उपक्रमांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये विश्वास आणि समाधान वाढत आहे.
सार्वजनिक स्वच्छतेमध्ये मोठी सुधारणा होत आहे. स्वच्छतेचे दृश्य आणि दूरगामी परिणाम नागरिकांना जाणवू लागले आहेत.
या सकारात्मक बदलाबाबत नागरिकांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांना पत्र तथा संदेश पाठवून महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले आहे. विशेषत: जी उत्तर विभागातील रहिवाशांनी घनकचरा व्यवस्थापन तसेच फेरीवाल्यांविषयक प्रश्नांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
जी उत्तर विभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, लेडी जमशेठजी मार्ग, कटारिया मार्ग, ६० फुटी मार्ग, ९० फुटी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) परिसरातील रस्ते अधिक स्वच्छ झाले आहेत. काही प्रमुख पदपथ फेरीवालामुक्त झाले आहेत. वाहतूक पोलिस तैनात असल्याने वाहतूक सुरळीत झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग वर्षभर म्हणजेच ३६५ दिवस सातत्याने कार्यरत आहे. गत वर्षभरात विविध प्रशासकीय विभगात लोकसहभागातून स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्याद्वारे सार्वजनिक स्वच्छता कार्यवाहीस आणखी व्यापक स्वरुप देत नागरी भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या अंतर्गत रस्ते, पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, सार्वजनिक प्रसाधनगृहांची दिवसातून ३ वेळा स्वच्छता व निर्जंतुकीकरण, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान – क्रीडांगणांची निगा, निर्मळ कर्मचारी वसाहत, फेरीवाला विरहित क्षेत्र, राडारोडा मुक्त परिसर आदी कार्यवाही केली जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले
Prakash sahadeo tukrul February 18, 2026 04:47 AM
खूप छान आपल्या कामाचे कौतुक व मनपूर्वक धन्यवाद
सुहास February 17, 2026 11:24 PM
फोटो काढून ठेवा अधिकृत बांधकाम दिसल्यास पाडा तक्रारीची किंवा चिरीमिरी ची वाट पाहू नका हप्ते खोरण मुळे हे सगळं फोफावलं होत. डायरेक्ट वॉर्ड ऑफिसर वर ऍकेकशन घेतली पाहिजे
Ramchandra zore February 17, 2026 11:00 PM
असेच मुंबईतील सर्व फुटपाथ रिकामी व्हावेत जेणेकरून चालणाऱ्या पब्लिक साठी मार्ग मोकळा होईल धन्यवाद