कथा : रमेश तांबे
हजार बाराशे वस्तीचं एक गाव होतं. गाव तसं सधन होतं. त्यांना त्यांच्या गावातल्या एका पुढाऱ्याचा पुतळा बनवायचा होता. म्हणून ते एका चांगल्या शिल्पकाराच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी गावाचं एक शिष्टमंडळ नेमलं होतं. एके दिवशी ते शिष्टमंडळ एका शिल्पशाळेत गेलं. तिथे अनेक मूर्ती, पुतळे ओळीने मांडले होते. ते पुतळे, तिथल्या मूर्ती खूपच छान होत्या. शिल्पकाराची कारागिरी बघून शिष्टमंडळ खूश झालं. त्यांनी ठरवलं की, याच शिल्पकाराला पुतळा बनवायला द्यायचं. मग दिवाणखान्यात दोघांची बोलणी सुरू झाली.
शिष्टमंडळात, सरपंच, दोन प्रतिष्ठित गावकरी, शाळेचे मुख्याध्यापक अशी मंडळी होती. आता चर्चा सुरू झाली. कोणाचा पुतळा बनवायचा आहे. कशा पद्धतीनं बनवायचा आहे. हे हळूहळू ठरत होतं. किती फुटांचा हवा? कुठे बसवणार? इतकी सारी इत्थंभुत माहिती त्यांनी शिल्पकाराला पुरवली.
शिल्पकार अगदी मन लावून ऐकत होता. शेवटी चर्चेची गाडी पैशावर आली. किती पैसे घेणार आपण? असं विचारल्यावर शिल्पकारानं कोणताही विचार न करता सरळ सांगून टाकलं की या पुतळ्याची मी पाच लाख रुपये बिदागी म्हणून घेणार. इतके पैसे ऐकल्यानंतर शिष्टमंडळातील अनेकांचे डोळे विस्फारले. त्यातला एक प्रतिनिधी अक्षरशः “काय एवढे पैसे!” असे ओरडलाच! त्यांच्याकडे पाहत शिल्पकार म्हणाले, “होय एवढेच पैसे मी आपणाकडून घेणार! त्यात एका पैशाची सूट मिळणार नाही.” शिष्टमंडळातला दुसरा सदस्य जमेल तितका गरीब भाव चेहऱ्यावर आणत शिल्पकाराला म्हणाला, “दादा काही पैसे कमी करता आले तर पाहा ना!” एक पुतळा बनवायचे एवढे पैसे कुणी घेतं का! शिल्पकार अगदी सावकाशीनं म्हणाले, “होय मी एवढेच पैसे घेतो. कारण एवढा मोठा पुतळा बनवायचा तर त्यासाठी भरपूर मेहनत असते. शिवाय वेळदेखील भरपूर लागतो. त्याचबरोबर मी माझे काम खूप कटाक्षाने चांगलेच करण्याचा प्रयत्न करतो.” पण शिष्टमंडळाचे सदस्य किंमत कमी करण्याचा आपला हेका काही सोडेनात. मग शिल्पकार सांगू लागला, “त्यात खूप काम असतं. त्यासाठी वेगवेगळी हत्यारे लागतात. खूप मेहनत असते. मदतीला अनेक माणसं लागतात.” एक सदस्य म्हणाला, “हे बघा शिल्पकार दादा, हवं तर आम्ही मदतीला माणसं देतो. काही हत्यारे लागतील ती आणून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण तुम्ही पैसे कमी करा!” शेवटी शिल्पकार म्हणाला, “नाही जमणार. माझ्या कामाचे मला पाच लाख रुपये मिळालेच पाहिजेत.” पण शिष्टमंडळ हट्टालाच पेटले, ते म्हणाले, “तुम्ही सांगा अजून तुमच्यासाठी आम्ही काय करू” मग शिल्पकार मोठ्या नम्रपणे म्हणाला, “मंडळींनो, खरंच हा पुतळा बनवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची माती लागते त्याशिवाय छान पुतळा तयार होत नाही.” तसा शिष्टमंडळातला एक उत्साही सदस्य लगेच म्हणाला, “दादा, आम्हाला सांगा कुठे मिळते ती माती. आम्ही लगेच ती घेऊन येऊ!” मग शिल्पकार हलकेच हसत म्हणाला, “अरे बाबांनो ही कला कमावण्यासाठी मी माझ्या आयुष्याची माती केली आहे. तेव्हा कुठे मला ही कला साध्य झाली आहे. त्यामुळे मला माझ्या कलेचं मूल्य मोजून घेतलंच पाहिजे!” शिल्पकाराचं बोलणं ऐकून सगळं शिष्टमंडळ अगदी गप्पच झालं!
तर मित्रांनो, कोणतीही कला मिळवण्यासाठी आपल्याला आयुष्यभर कष्ट, मेहनत करावी लागते. झोकून देऊन काम लागतं. आयुष्याची माती करावी लागते. तेव्हा कुठे आपल्याला यश मिळतं. झाडांची मुळं स्वतःला गाडून घेतात जमिनीत, अंधार कोठडीमध्ये. तेव्हा पुढे झाड वाढतं. तसेच एखाद्या कलाकाराला आयुष्यभर कोंडून घ्यावं लागतं, मेहनत करावी लागते. समाजापासून दूर राहावं लागतं. नंतर पुढे त्याला ती कला प्रसन्न होते. पण आपल्यापैकी बरेच जण मात्र कोणतीही मेहनत न करता आपल्याला दैवी चमत्काराने कला प्राप्त होईल, याची आयुष्यभर वाट पाहत बसतात.







