मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अग्नितांडव सुरु आहे. अशातच आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाजप खासदाराच्या गाडीने भर रस्त्यात अचानक पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
राजस्थानचे भाजप खासदार लुंबाराम चौधरी यांच्या लग्जरी रेंज रोवर कारला अचानक आग लागली. मुंबई - नाशिक महामार्गावर शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) ही आग लागली. अचानक लागलेली आग ही इतकी तिव्र होती की संपूर्ण गाडी काही क्षणात जळून खाक झाली.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी रवाना:
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार लुंबाराम चौधरी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी वाशिम येथून नाशिककडे निघाले होते. ते त्यांच्या ४ कोटीच्या रेंज रोवर कारने प्रवास करत होते. गोंदे फाटा परिसरातून जात असताना ड्रायव्हरला अचानक काहीतरी जळण्याचा वास आला. परिस्थितीची गांभीर्य ओळखून चालकाने तात्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर लगेच कारला आग लागली, पण ड्रायव्हरच्या समजुतीमुळे खासदार लुंबाराम चौधरी आणि त्यांच्यासोबतचे सर्वजण वेळेवर सुरक्षित बाहेर काढले गेले. मात्र, काही मिनिटांतच आगने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार जळून खाक झाली.
या अपघाताची माहिती मिळताच वाडिवरे पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक अग्निशमन दलालाही बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रमाने आग आटोक्यात आणली.







