कोलंबो : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित लढत रविवारी श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी विजयाची 'हॅटट्रिक' करण्यासाठी मैदानात उतरतील. गुणतालिकेत दोन्ही संघ सध्या प्रत्येकी ४ गुणांसह अव्वल स्थानी असून, आजच्या विजयामुळे 'सुपर-८' चा मार्ग सुकर होणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत अमेरिका आणि नामीबियाला धूळ चारत जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. भारताची फलंदाजी आणि जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजी सध्या फॉर्मात आहे. दुसरीकडे, सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघानेही आपले दोन्ही सामने जिंकून भारताला कडवे आव्हान देण्याची तयारी केली आहे.
दरम्यान भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा गेल्या काही दिवसांपासून आजारी असून तो नामिबियाविरुद्ध खेळला नव्हता. पण सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा असून तो पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शर्माच्या येण्याने संजू सॅमसनला पुन्हा बाकावर बसवले जाऊ शकते. याशिवाय भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादव याची एन्ट्री होऊ शकते. कोलंबोची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी पोषक मानली जातेय आणि भारतीय संघ अतिरिक्त फिरकीपटूसह मैदानावर उतरू शकतो. कुलदीपसाठी रिंकू सिंगला बाहेर बसवले जाऊ शकते. पण, जर भारतीय संघाला फलंदाजीत तडजोड करायची नसेल तर कुलदीपच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला खेळवले जाऊ शकते किंवा रिंकूच्या जागीही तो खेळू शकतो. शिवम दुबेच्या जागी मोहम्मद सिराजचे पुनरागमन होऊ शकते.
अशात सलमान आघाने म्हटले आहे की, त्यांना सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळायचे असल्याने अभिषेकने खेळावे. अशा प्रकारे त्याने एकप्रकारचे आव्हान दिले आहे. सलामान आघा त्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, 'मला आशा आहे अभिषेक शर्मा खेळेल. मला आशा आहे तो बरा होईल. आम्हालाही सर्वोत्तम संघाविरुद्धच खेळायचं आहे.' अभिषेक आत्तापर्यंत या टी-२० वर्ल्ड कपमध्ये केवळ अमेरिकेविरुद्धचा सामना खेळला होता. या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर आजारी असल्याने क्षेत्ररक्षणासाठीही आला नव्हता. त्यानंतर नामिबियाविरुद्ध त्याच्या जागेवर संजू सॅमसन खेळला होता.
हस्तांदोलनाबद्दल आघा म्हणाला...
गेल्यावर्षी पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाकडून पाकिस्तान खेळाडूंशी कोणताही संबंध ठेवण्यात आला नव्हता. या दोन संघात तीन सामने झाले, पण कोणत्याही प्रकारचा संवाद झाला नव्हता. त्यातही भारतीय संघाने हस्तांदोलन करणेही टाळले होते, ज्याची मोठ्याप्रमाणात चर्चा झाली होती. त्यामुळे आता टी-२० वर्ल्ड कपमध्येही भारतीय संघ हस्तांदोलन करण्याचा निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सलमान आधाने एका वाक्यात उत्तर दिले की 'ते आपण बघू.'
जाहिरातींचे दर गगनाला भिडले
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, याचा थेट परिणाम जाहिरात बाजारपेठ आणि पर्यटन क्षेत्रावर झाल्याचे दिसून येत आहे. या एका सामन्याने जाहिरातींच्या दरांपासून ते विमानभाड्यापर्यंत सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. या महामुकाबल्यासाठी जाहिरात बाजारपेठेत लक्षणीय तेजी आली आहे. उद्योग तज्ञांच्या मते, १० सेकंदांच्या टीव्ही जाहिरात स्लॉटची किंमत आता ३० ते ४० लाखांच्या घरात पोहोचली आहे.
विमान आणि हॉटेलच्या किमतीही वाढल्या
हाती आलेल्या वृत्तानुसार ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इझमायट्रिपनुसार राउंड-ट्रिप विमानभाडं सामान्य दिवसांच्या तुलनेत ४५ ते ५० टक्क्यांनी महाग झालं आहे. मेकमायट्रिप च्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीच्या वीकेंडसाठी कोलंबोच्या बुकिंग्स गेल्या तीन दिवसांत दुप्पट झाल्या आहेत. तर क्लिअरट्रिप सांगते की भारत–पाकिस्तान सामन्यामुळे कोलंबोसाठीच्या बुकिंगमध्ये जवळपास ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. याचाच परिणाम हॉटेल दरांवरही दिसतोय. कोलंबोमधील पंचतारांकित हॉटेल्सना सर्वाधिक मागणी असून, प्रीमियम रूम्सचे दर सामान्य सीझनपेक्षा २०–२५ टक्क्यांनी वाढले आहेत. हॉटेल इंडस्ट्रीच्या मते, सामना सुरू असलेल्या कालावधीत शहरातील बहुतांश प्रमुख प्रॉपर्टीज जवळपास ‘फुल’ होण्याच्या मार्गावर आहेत. एकूणच, भारत–पाकिस्तान सामना हा आता केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहिलेला नाही. जाहिरातींपासून पर्यटनापर्यंत, प्रत्येक क्षेत्रात या सामन्याचे आर्थिक परिणाम दिसत आहेत.
संभाव्य संघ
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन, संजू सॅमसन/अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव/वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान: सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हारिस, बाबर आझम, फखर झमान, सईम अयुब, शादाब खान, इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद
भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये अटीतटीची लढत
क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा आणि रोमांचक संघर्ष म्हणून ओळखला जाणारा भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला आज कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मधील या हाय-व्होल्टेज सामन्याची जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सुरुवातीला नकार देणाऱ्या पाकिस्तानने अखेर मैदानात उतरण्याची तयारी दर्शवल्याने या लढतीतील चुरस अधिकच वाढली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत अमेरिका आणि नामीबिया विरुद्ध सहज विजय मिळवून आपला दबदबा निर्माण केला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा प्रवास काहीसा अडखळत सुरू आहे. नेदरलँड्सविरुद्ध १४७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या नाकीनऊ आले होते; ते जणू ‘रडत-रडत’ जिंकले आहेत. अशा स्थितीत भारताच्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना रोखण्याचे मोठे आव्हान कर्णधार सलमान आगासमोर असेल. अभिषेक शर्माच्या पुनरागमनामुळे भारताची सलामी अधिक आक्रमक झाली आहे. इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल अशी तगडी फलंदाजी भारताकडे आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती हे कोणत्याही फलंदाजीला खिंडार पाडण्यास सक्षम आहेत. बाबर आझम अजूनही आपल्या फॉर्मसाठी संघर्ष करत आहे. साहिबजादा फरहान, सईम अयुब आणि उस्मान खान यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांच्या गोलंदाजीवर पाकिस्तानची मदार असेल. कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांच्या साथीने फिरकीचे जाळे विणून पाकिस्तानला रोखण्याचे नियोजन भारताने केले आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले असले तरी, सांघिक कामगिरी पाहता भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियम भारतीय संघ १५ टी-२० सामने खेळला आहे त्यातील ११ सामन्यात भारतीय संघ विजयी झाला आहे. ४ सामन्यात पराभव झाला आहे. भारत-पाकिस्तान एक लढत झाली आहे त्यात भारतीय संघ विजयी झाला आहे. पाकिस्तान ७ सामने खेळला आहे त्यातील ५ सामन्यात विजयी झाला आहे २ सामन्यात पराभव झाला आहे. तरीही भारत-पाकिस्तान सामन्यात दबावाचा जो सामना करेल, तोच बाजी मारेल.