मुलुंड: मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला. रस्त्याने जाणाऱ्या रिक्षा आणि एका कारवर हा स्लॅब पडल्याने या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून एकाच मृत्यू झाला आहे. या घटनेवर मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "हा १०० टक्के निष्काळजीपणा आहे, दोषींवर कडक कारवाई केली जाईल" असे त्यांनी सांगितले. रितू तावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या रितू तावडे ?
"१०० टक्के निष्काळजीपणा झाला आहे. मी बघितलेल्या फोटो आणि व्हिडीओतून हा निष्काळजीपणा सरळ दिसत आहे. कालच हा पॅराफिट वॉल बसवला होता असं मला समजलं. कालच बसवल्यानंतर आज पडला असेल तर हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे. क्य़ुरिंग, बॅरिकेड्स सगळाच निष्काळजपणा दिसत आहे."
पुढे बोलतांना रितू तावडे म्हणाल्या की; "मी अधिक माहिती आमदारांकडून घेते आणि कळवते. १०० टक्के कारवाईची मागणी करणार. मी गाडीत असताना प्रशासनाकडून माहिती घेत होते. क्युरिंग करत होते का? इंजिनिअर्सनी लक्ष ठेवलं होतं का? एसओपीचं पालन केलं जात होतं की नाही? हे का झाल? याची कारणं शोधावी लागतील. बॅरिकेड्स का लावण्यात आले नव्हते? खालून जाणाऱ्या गाड्यांना थांबवण्याची गरज होती."
मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेवर महापौर रितू तावडेंची पहिली प्रतिक्रिया . .#prahaarnewsline #metroaccident #metroline4 #mulund #ritutawde pic.twitter.com/ZVDUbvOh7g
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) February 14, 2026
उपासना रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं आहे. इतर तिघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती रितू तावडे यांनी दिली. मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. पायाभूत सुविधा चांगल्या करताना, सुखसुविधा देताना एसओपी फॉलो करण्याची गरज आहे. आम्ही संवेदनशील असून सर्वजण उपस्थित आहोत असं रितू तावडे यावेळी म्हणाल्या.
भलेमोठे गर्डर आणि स्लॅब वरती चढवण्याचे काम सुरु:
मिळालेल्या माहितीनुसार मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री (LBS Road) मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. त्यासाठी याठिकाणी दररोज भलेमोठे गर्डर आणि स्लॅब वरती चढवण्याचे काम सुरु असते. आज शनिवारी मेट्रोचा एक स्लॅब खाली कोसळला. त्यावेळी खालच्या एलबीएस रोडवरुन वाहने ये-जा करत होती. हा स्लॅब एका ऑटो रिक्षावर आणि कारवर कोसळला.







