मुंबई : महाराष्ट्रातून थंडी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत दिसत आहे. पण राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेले 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा, यामुळे महाराष्ट्राच्या हवामानात १७ आणि १८ फेब्रुवारीला मोठी उलथापालथ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे १७ फेब्रुवारीच्या रात्रीपासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. तसेच अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातही पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमानात १ ते २ अंशांची घसरण दिसत आहे. पण पावसाची शक्यता एकदम कमी आहे. विदर्भात १८ फेब्रुवारीनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन पारा चढण्यास सुरुवात होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे.
महाराष्ट्रात केवळ पावसाचा शिडकावा अपेक्षित असताना, दक्षिण भारतात मात्र निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळू शकते. श्रीलंकेवरून येणारे कमी दाबाचे क्षेत्र तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे कन्याकुमारी, मदुराई आणि तंजावर या भागात १७ आणि १८ फेब्रुवारीला 'अतिवृष्टी' होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळ सदृश स्थितीमुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही वाऱ्याचा वेग वाढणार आहे.







