माझी प्राथमिक शाळा

विशेष : लता गुठे


आजही गावी गेल्यानंतर शाळेच्या समोरच्या रस्त्यावरून जाताना नकळत शाळेकडे लक्ष जातं आणि ते सगळं बदललेलं पाहून आमची ती प्राथमिक शाळा आठवू लागते. ही गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातील माझ्या शाळेची. त्याकाळी आजच्यासारखे मुलांच्या पालकांना अॅडमिशनचे कौतुक नव्हते. जूनमध्ये शाळा सुरू झाल्या की गुरुजी घरोघरी जाऊन मुलांचा शोध घेत असत. चार ते सात वयोगटातील मुलांची जन्मतारीख १ जूनच असायची. घरी येऊन नाव नोंदणी केली की झालं अॅडमिशन. फी नाही की युनिफॉर्म नाही, कुठल्या कटकटी नाहीत. कापडाच्या पिशवीत एक पाटी-पेन्सिल टाकली की झालं दप्तर.


असंच माझं ॲडमिशन वयाच्या पाचव्या वर्षी इयत्ता पहिलीत झालं. काकांचा मुलगा माझ्यापेक्षा वयाने सहा महिन्यांनी मोठा होता. त्याचं आणि माझं ॲडमिशन एकाच दिवशी झालं आणि शाळा सुरू झाली. गावातील मारवाड्याच्या वाड्यात आमची शाळा भरत असे. तो चौकाचा वाडा आजही आठवतो. मोठ्या तीन खोल्यांत तीन वर्ग बसत असत. पहिली आणि बालवाडी एकत्र, दुसरी-तिसरी एकत्र आणि चौथी एकत्र या तीन वर्गांना शिकवण्यासाठी तीन शिक्षक असत. पहिल्या दिवशी वडील शाळेत सोडायला आले. त्यांनी बाईंच्या हवाली आम्हा दोघांना केले. बाईंनी अंगावरून मायेने हात फिरवला. त्याच क्षणी शाळेची भीती क्षणात पळून गेली. आमच्या नर्मदाबाई साक्षात दुसऱ्या सावित्रीबाईच. पांढऱ्या रंगाची प्रिंटेड नऊवारी साडी नेसलेल्या, डोक्यावरून पदर. छान कपाळावर कुंकू आणि प्रेमळ चेहरा. त्यांनी सर्वांना रांगेत प्रार्थनेसाठी बसवलं. समोरच गुरुजी उभे होते. सहा फूट उंच, गोरापान रंग, लांब नाक आणि कायम चेहऱ्यावर स्मित रेषा. नर्मदाबाई आणि तुळशीराम गुरुजी यांची जोडी लक्ष्मीनारायणासारखी शोभून दिसत असे. पांढराशुभ्र शर्ट, पायजमा, डोक्यावर टोपी घातलेले तुळशीराम गुरुजी समोर येऊन मांडी घालून बसले आणि ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना सुरात म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या पाठीमागे आम्ही म्हणू लागलो, अशाप्रकारे शाळेचा पहिला संस्कार त्या दिवशी रुजला. प्रार्थनेनंतर बाईंनी सर्वांना पाटी-पेन्सिल काढायला सांगितली आणि मुलांच्या जवळ बसून हातात हात घेऊन बाईंनी पाटीवर श्री गणेशा गिरवून घेतला.


आमच्या शाळेची वेळ सकाळी ७ ते ११ आणि दुपारी २.३० ते ५ अशी असे. आदल्या दिवशी रात्रीच आई तेल लावून घट्ट दोन वेण्या घालून झोपताना डोक्याला कपडा बांधून ठेवत असे. सकाळी उठल्यानंतर तोंड धुवून दूध पिलं की शाळेत जायची घाई होत असे. दुपारी मात्र शाळेत जाऊन बसलं की डुकली यायची. बाईंचे लक्ष गेले की त्या आतल्या रूममध्ये घेऊन जायच्या आणि तिथे सतरंजीवर झोपवायच्या. दुपारची शाळा अर्धी झोपेतच गेली. दुसरीला गेले तेव्हा गावाच्या बाहेर एका छोट्या टेकडीवर प्राथमिक शाळा होती. त्या शाळेला मोठं अंगण होतं. हिवाळ्यात शाळेच्या पटांगणात शाळा भरायची, तर उन्हाळ्यात झाडाखाली. पावसाळ्यात शाळेच्या पत्र्यावर नाचत येणारा पाऊस हवाहवासा वाटायचा. आमच्यासारखाच झाडावर पक्ष्यांचाही चिवचिवाट असायचा. मोकळ्या हवेत, निळ्याशार आकाशाच्या मंडपाखाली असलेली शाळा. कधी चौथी संपली समजलेही नाही.
बऱ्याच जणांच्या पायात चप्पलही घातलेली नसायची. मुलं शाळेकडे धावत सुटायची. रस्त्यावर दगड धोंडे असायचे. कित्येक वेळा ठेच लागून पडलं की गुडघे फुटायचे. जखमेवर फुंकर मारून पुन्हा उठायचे आणि शाळेकडे धावायचे. मध्येच शेळ्या, गुरं, तर कधी डोक्यावर शेणाची टोपली किंवा विहिरीवरून पाणी आणणाऱ्या बायका भेटायच्या, तसेच गावातील पुरुष मंडळी पारावर बसलेली असायची. गावातील सर्वच काका-काकू, मामा, मावशी अशा नात्यांनी जोडलेली असायची. त्यामुळे प्रत्येक जण बोलायचे, खुशहाली विचारायचे. हे सर्व पार करत शाळेत पोहोचेपर्यंत प्रार्थनेची वेळ व्हायची. सर्व शाळेतील मुले पटांगणात एकत्रच प्रार्थनेसाठी जमा होत असत. राष्ट्रगीत जन गण मन, भारत माझा देश आहे या दोन प्रार्थना सुरू झाल्या की आजूबाजूचा सारा परिसर त्या प्रार्थनेत सामावलेला असे. प्रार्थनेमुळे शिस्त, देशप्रेम, आपुलकी या भावना आपोआप रुजल्या जात असत. शाळेत सर्व उत्सव साजरे केले जात असत. २६ जानेवारी, १५ ऑगस्टला दोन-तीन दिवस आधीपासून तयारी सुरू असायची. शाळेतील मुलेच सर्व तयारी करत असत. जी मुलं चुणचुनी बोलकी असायची त्यांच्याकडून शिक्षक भाषण पाठ करून घेत असतात. पहिलं व्यासपीठ दुसरीच्या शाळेत असताना मिळालं. त्या काळातील शिक्षक म्हणजे केवळ शिकवणारे फक्त मास्तर नव्हते, तर ते मार्गदर्शक, पालकही होते. वेळप्रसंगी शिक्षाही करायचे आणि चांगले काही केले तर कौतुकाची थाप मारून शाब्बासकीही द्यायचे.


आमचे शिक्षक गणिताचे पाढे, मराठीची कविता तालात म्हणत असल्यामुळे कविता लगेच पाठ होत असत आणि इतिहास म्हणजे कथा सांगितल्यासारखा शिकवत असत. त्यामुळे हे सर्व शाळेतच पक्क होऊन जात असे. चौथीपर्यंत होमवर्क नसायचा, त्यामुळे घरी आलं की मनसोक्त अंगणात खेळायचं. हीच त्या काळातील अध्यापनपद्धती. विज्ञान प्रयोगशाळा नव्हती; पण आकाश, झाडं, विहीर, शेती-हेच जिवंत प्रयोग होते. परगावावरून येणारी मुलं चटणी-भाकरी- भाजी जे काय असेल ते घेऊन यायचे. एखाद्या मुलाकडे भाकरी नसेल, तर तो उपाशी राहायचा नाही. शाळेत कधीच कोणाशी स्पर्धा नसायची. शाळेच्या ओट्यावर अभ्यास, मैदानात खेळ आणि शिक्षकांचं मार्गदर्शन हे सगळं नकळत आयुष्याचे धडे देऊन जायचे. आज आधुनिक इमारती, स्मार्ट फोन आणि डिजिटल शिक्षण आले आहे. पण ऐंशीच्या दशकातील ग्रामीण प्राथमिक शाळेतील माणुसकी, आपुलकी आणि साधेपणा हे मूल्य आज दुर्मीळ झाले आहे. त्या शाळांनी केवळ अक्षरओळख दिली नाही, तर आयुष्याला दिशा दिली. आजही गावातून जाताना एखादी जुनी शाळा दिसली, की मन नकळत थांबतं… आणि त्या कौलारू छपराखालून उमटलेला प्रार्थनेचा सूर पुन्हा कानात घुमू लागतो. त्या काळात ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी इमारत नव्हती, तर ती गावाच्या सांस्कृतिक, नैतिक आणि भावनिक जडणघडणीचं केंद्र होती.

Comments
Add Comment

गाण्यातून उमगणारी लता..

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ६ फेब्रुवारी रोजी चौथा स्मृतिदिन झाला. भारतातील जवळपास सर्व भाषांमध्ये लता

‌‘राईट टू डिस्कनेक्ट‌’ साधणार समतोल

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर कार्यकालीन काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल म्हणजे कामाच्या जबाबदाऱ्या आणि

छकडा मोडणे व तृणावर्ताचा उद्धार

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे बालकृष्णाच्या लीला व कृष्ण कथा जेवढ्या ऐकाव्या तेवढ्या गोडच वाटतात. तसेच

थोडा हैं थोडे की जरुरत हैं...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे आपल्या पहिल्याच चित्रपटाला ‘पाथेर पांचाली’(१९५५) तब्बल ११ आंतरराष्ट्रीय

शोकगीतात दडलेलं मंजुळ भावगीत - ‘मर्सिया’

िवशेष : अश्विनी शिंदे व्हॅलेंटाईन डे म्हटलं की छान गुलाबी वेष्टनात गुंडाळलेलं प्रेम... कॅण्डल लाईट डिनर...नाही

व्हॅलेंटाईन डे

प्रेमाचा प्रश्न, की संस्कृतीची परीक्षा? संवाद : िनशा वर्तक प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या ठरावीक दिवसाची गरज