मुंबई : अजित पवारांचे बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान अपघातात निधन झाले. या प्रकरणी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अर्थात सीआयडीने अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची मंत्रालयात सुमारे ४ तास कसून चौकशी केल्याचे समजते. अजितदादांच्या अपघाताच्या आदल्या रात्री या संदर्भात अविनाश सोलवट यांना वारंवार उलटसुलट प्रश्न विचारण्यात आल्याचे वृत्त आहे.
अजित पवार आधी कारने बारामतीला जाणार होते. आयत्यावेळी विमान प्रवासाचे नियोजन झाले. कार्यक्रमातला हा बदल नेमका कधी आणि का करण्यात आला. हा निर्णय कोणत्या व्यक्तीने घेतला आणि त्यापुढे आवश्यक ते नियोजन कोणी केले हे सीआयडीने जाणून घेतले. अविनाश सोलवट यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी सुरू आहे. तसेच विमानाच्या ब्लॅकबॉक्समधील माहितीचे विश्लेषण करण्याचे काम तज्ज्ञ करत आहेत. विमानाचा जमिनीवर आदळण्यापूर्वीचा मार्ग आणि त्यानंतरचा स्फोट या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
उड्डाणाआधी विमानाची तांत्रिक तपासणी तसेच आवश्यक ती देखभाल - दुरुस्ती करणाऱ्यांचीही कसून चौकशी होणार असल्याचे समजते. अजित पवारांच्या विमानाचा अपघात हा तांत्रिक कारणामुळे झाला की त्यामागे काही षडयंत्र होते या प्रश्नाचे उत्तर सीआयडी शोधत आहे. याआधीच नागरी विमान वाहतूक संचालनालयाने तज्ज्ञांच्या मदतीने अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू केली आहे. सीआयडी अजित पवारांच्या निवडक जवळच्या लोकांची कसून चौकशी करत असल्याचे समजते. तपासाचा भाग म्हणून ही प्रक्रिया सुरू आहे. अद्याप कोणावरही थेट संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. तसेच कोणालाही पकडण्यात आलेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागरी विमान वाहतूक संचालनालयाने नेमलेल्या समितीचे तज्ज्ञ विमानाचा वेग, उंची, इंजिनचे तापमान आणि पायलटमधील संभाषणाचे तांत्रिक विश्लेषण करत आहे. विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून स्फोटाचं स्वरूप आणि आगीचं कारण जाणून घेतलं जाईल. अपघाताचे कारण मानवी चूक, तांत्रिक बिघाड की घातपात या शक्यतांचीही पडताळणी होणार आहे.






