नाशिक पालिकेत दीर्घकाळानंतर लोकप्रतिनिधींची राजवट

नाशिक महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या उमेदवारीवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. नाशिक महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. आता केवळ अधिकृत निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता बाकी आहे.


नाशिक महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट होती. मात्र शुक्रवारी, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेत महापौर व उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर ही राजवट संपुष्टात येणार आहे. महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरात सुमारे ३० हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे रस्ते, वीज, पाणी व इतर मूलभूत सुविधांसाठी लोकप्रतिनिधींकडून मोठ्या अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांवर साडेतीन ते चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. मात्र ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील २० जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका रखडल्या असून, त्याबाबत अद्याप न्यायालयाकडून स्पष्ट निर्णय झालेला नाही.


चार वर्षांनंतर झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ७२ जागा मिळविल्या. २०१७ मध्ये भाजपने ६६ जागा मिळवून सत्ता स्थापन केली होती. प्रारंभी अडीच वर्षे रंजना भानसी, तर पुढील अडीच वर्षे ज्येष्ठ नेते सतीश कुलकर्णी यांनी महापौर म्हणून काम पाहिले. यंदा भाजपने आपलाच विक्रम मोडत ७२ जागा मिळवत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता स्थापन केली आहे. नाशिकचे प्रभारी व जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महापौरपदासाठी हिमगौरी आडके व उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे जाहीर केली असून, शुक्रवारी होणाऱ्या महासभेत केवळ औपचारिकता बाकी आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहर व परिसरात सुमारे ३० हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण (व्हाइट टॉपिंग) करण्याचे निर्देश दिले आहेत. द्वारका चौकात अंडरपासचे काम सुरू झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. इंदिरानगर बोगद्याचेही विस्तारीकरण सुरू असून, येत्या वर्षभरात नाशिकचे बहुतांश प्रश्न सुटतील, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. हिमगौरी आहेर-आडके या माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब आहेर व माजी उपमहापौर शोभना आहेर यांच्या कन्या आहेत. दिवंगत माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर हे त्यांचे काका होत. त्या आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या चुलत भगिनी आहेत. हिमगौरी यांनी पुण्यातील कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई (आयटी) पदवी घेतली आहे. २०१७ मध्ये त्या प्रभाग ७ मधून प्रथम निवडून आल्या. २०१८ मध्ये त्या स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती ठरल्या. सध्या त्या श्री सप्तशृंगी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आहेत व सलग दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. उपमहापौरपदासाठी निवड झालेले मच्छिंद्र सानप हे दुसऱ्यांदा नगरसेवक झाले असून, ते माजी महापौर व आमदार बाळासाहेब सानप यांचे सुपुत्र आहेत. बाळासाहेब सानप यांनी भाजप शहराध्यक्ष, उपमहापौर, महापौर व आमदार अशी विविध पदे भूषवली आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी विविध पक्षांत प्रवेश केला होता; मात्र सध्या ते पुन्हा भाजपमध्ये आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३ (क) मधून विजय मिळवला आहे. महापौर व उपमहापौर दोघांनाही राजकीय वारसा लाभलेला असून, त्यांच्या अनुभवाचा नाशिकच्या विकासाला फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


नाशिक महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने अन्य पक्षांच्या पाठिंब्याची गरज नसल्याचे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. मात्र अलीकडे त्यांनी भूमिका बदलत शिवसेना (शिंदे गट) सोबत सत्तेत सहभागी होण्याची शक्यता सूचित केली आहे. केंद्र व राज्यात महायुतीची सत्ता असल्याने नाशिक महापालिकेतही भाजप व शिवसेना एकत्र काम करू शकतात, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक नेत्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या एक-दोन दिवसांत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, असे महाजन यांनी सांगितले. भाजपकडून मच्छिंद्र सानप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवीण तिदमे, विलास शिंदे व राहुल दिवे यांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उपमहापौरपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई व ठाणे महापालिकेतील सत्तेच्या तडजोडीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही भाजप-शिवसेना युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-धनंजय बोडके

Comments
Add Comment

खट्टा-मिठा अर्थसंकल्प

या वर्षीचा अर्थसंकल्प ना फार सकारात्मक आहे, ना फार नकारात्मक. अपेक्षा आणि वास्तव यांची सरमिसळ असलेला हा

अमेरिका - क्युबातील शत्रुत्व

ट्रम्प यांनी क्युबाला ‘करार करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा’ असा इशारा दिला आहे. अमेरिका आणि क्युबा यांच्यात

पुण्याच्या राजकारणाचे अजितदादांनंतरचे संक्रमण

पुण्याच्या राजकारणात पालकमंत्रीपदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हा नियोजन समिती, विकास निधीचे वाटप,

ग्रीनलँडकडे नजर फक्त खनिजांसाठी?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा वैश्विक आर्थिक मंचावर बदलली असली आणि त्यांचे स्वर थोडे नरम झाले

दक्षिण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारीचे स्वप्न

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर आणि जागतिक

राजकारणात ‘बिनविरोध’चा नवा पॅटर्न

आठ वर्षांनंतर होणाऱ्या या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोकणात जिल्हा परिषद, पंचायत समितीत आपलीच सत्ता