Wednesday, February 4, 2026

सर्वसामान्यांसाठी सुरू केलेली एकही योजना बंद होणार नाही

सर्वसामान्यांसाठी सुरू केलेली एकही योजना बंद होणार नाही

राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकरी, महिला आणि युवकांचा

बार्शी येथील सभेत आमदार दिलीप सोपल यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उधळली स्तुतीसमने

बार्शी : राज्याच्या तिजोरीवर सर्वप्रथम अधिकार हा शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचा असल्याचे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, या घटकांसाठी सुरू करण्यात आलेली एकही योजना कधीही बंद होणार नाही. कोणीही कितीही विरोध केला, कोर्टात गेले, आरोप केले तरी सरकारने सुरू केलेल्या योजना अखंड सुरू राहतील, हा शब्द त्यांनी जनतेला दिला.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार दिलीप सोपल यांच्यावर भरभरून स्तुतीसुमने उधळली. “आमदार कसा असावा, तर दिलीप सोपल यांच्यासारखा असावा. ते सगळ्यांचे मित्र आहेत, शत्रू कोणाचाही नाही. सहा-सात वेळा निवडून येणं हा योगायोग नाही, तर वर्षानुवर्षांच्या कामाची पोचपावती आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. भर उन्हातही लोकांची गर्दी पाहून सोपल साहेबांच्या कामाची जाणीव होते, असे सांगत पुढील काळात ते पुन्हा एकदा मोठ्या फरकाने विजयी होतील आणि मंत्रिमंडळात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सभेत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर विशेष भर दिला. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून देणारा खरा कणा म्हणजे कार्यकर्ता आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा पाठीचा कणा असतो. “मी जरी उपमुख्यमंत्री असलो, तरी मी मुळात कार्यकर्ता आहे. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणूनच मी कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता आहे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनाचा उल्लेख करत महाराष्ट्रावर शोककळा पसरल्याची भावना व्यक्त केली.

सरकारच्या योजनांबाबत बोलताना शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी १०० टक्के फी माफी, शेतकरी सन्मान योजना अंतर्गत दरवर्षी ६,००० रुपये थेट खात्यात जमा, पीक विमा योजना, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईसाठी एनडीआरएफ नियमांमध्ये बदल आणि दुप्पट मदत अशा अनेक योजना सरकारने राबवल्या आहेत.

एका भावनिक घटनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, शिक्षणासाठी फी भरू न शकल्याने एका मुलीने आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर एका आठवड्यात कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणून सरकारने ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के फी माफीचा निर्णय घेतला. “मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल, तर सरकारचा उपयोग काय?” असा सवाल करत त्यांनी सरकारची संवेदनशीलता अधोरेखित केली.

शेतकऱ्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शेतकरी हा या राज्याचा मायबाप आहे. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचाच आहे. मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग असून ‘दुष्काळ’ हा शब्दच पुसून टाकून दुष्काळमुक्त मराठवाडा घडवायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जवळगाव मध्यम प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे, बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करणे आणि अपर तहसील कार्यालय उभारणे या मागण्या त्यांनी तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

तरुणांच्या रोजगारावरही त्यांनी भर दिला. “तरुणांनी नोकरीसाठी मुंबई, ठाणे, पुण्याकडे जाऊ नये, त्यांना इथेच रोजगार मिळाला पाहिजे,” असे सांगत एमआयडीसी स्थापन करून उद्योग आणण्याचा शब्द त्यांनी दिला. उद्योग, रोजगार आणि स्थानिक विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

वैराग नगरपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात विकासकामांची घोषणा करत त्यांनी रस्ते व गटारींसाठी २० कोटी, वैकुंठ स्मशानभूमीसाठी ५ कोटी, सीसीटीव्हीसाठी २ कोटी आणि नगरपंचायत नवीन इमारतीसाठी ७ कोटी, असा एकूण सुमारे ३४ कोटींचा निधी मंजूर करण्याचा शब्द दिला. नगरपंचायतीची चांगली इमारत उभारली पाहिजे, प्रशासनासाठी आवश्यक सुविधा दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी तात्काळ ५ कोटी देण्याची घोषणाही त्यांनी केली. “हे पैसे आमचे नाहीत, हे जनतेचे पैसे आहेत आणि जनतेच्या कामासाठीच ते वापरले जातील,” असे ठामपणे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साडेचारशे कोटी रुपये देऊन ७० ते ८० हजार लोकांचे प्राण वाचवले गेले आहेत. “आम्ही मालक नाही, सेवक आहोत. खरे मालक जनता आहे,” असे सांगत त्यांनी लोकशाहीतील जनतेच्या सर्वोच्च स्थानाची आठवण करून दिली.

“मी जे बोलतो, ते करून दाखवतो. एकदा शब्द दिला की मागे फिरत नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला. मनरेगा अंतर्गत पानंद रस्ते, सिमेंट रस्ते, पाणीपुरवठा योजना, गोठे आणि ग्रामीण विकासाच्या सर्व कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सभेच्या शेवटी त्यांनी पुन्हा एकदा आमदार दिलीप सोपल यांच्या कार्याची प्रशंसा करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. “सात वेळा निवडून आलेले दिलीप सोपल साहेब आठव्यांदाही निश्चितच निवडून येतील. त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि विकासाची गती अधिक वाढवा,” असे सांगत त्यांनी सभेचा समारोप केला.

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा