Friday, June 26, 2026

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसात पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात हळुहळू वाढ होत असून, जलस्थितीत सुधारणा दिसून येत आहे. मागील आठवड्यात अवघ्या १३ टक्क्यांपर्यंत घसरलेला पाणीसाठा आता वाढून १८.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या मान्सुनच्या सुरुवातीच्या काळात पावसाने अपेक्षित हजेरी लावली नव्हती. जून महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत अनेक भागात पावसाचा खंड पडल्याने धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक वाढू शकला नव्हता. परिणामी, पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक वापरासाठी आवश्यक जलसाठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. काही धरणांमधील साठा झपाट्याने कमी झाल्याने प्रशासनही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरू होती. डोंगराळ भागांमध्येही चांगला पाऊस पडत असल्याने नद्या, नाले, ओढे आणि जलप्रवाह पुन्हा प्रवाही झाले आहेत.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होत आहे. कोलाड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील २८ धरणांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी पाहता बहुतांश धरणांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील वावे धरणाने सर्वाधिक प्रगती करत ५० टक्क्यांहून अधिक साठा गाठला आहे. याशिवाय, सुतारवाडी, आंबेघर, भिलवले, मोरबे या धरणांमध्ये ३१ ते ५० टक्क्यांदरम्यान पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. अनेक मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये ११ ते ३० टक्के साठा जमा झाला असून, काही धरणांमध्येही जलपातळीत सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी, तसेच भातशेतीसाठी धरणांतील पाणीसाठा महत्वाचा मानला जातो.

यंदा पावसाळ्याला उशिरा सुरुवात झाल्यामुळे भात पेरणी आणि शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता धरणांमधील वाढता जलसाठा आणि सुरू असलेला पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आगामी काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास भातशेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसह रायगड जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास धरणांमधील पाणीसाठ्यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, शेती आणि इतर वापरासाठी आवश्यक जलसाठ्याबाबत आशादायक चित्र निर्माण झाले असून, प्रशासनाकडून धरणांतील पाणीसाठ्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा