सकारात्मकता

जीवनगंध,पूनम राणे

खेडेगावातील शाळा, निसर्गरम्य वातावरण. आजूबाजूला नारळी, पोपळी काजू, आंबे, केळी यांच्या बागांच्या मध्यभागी वसलेली ही शाळा.
इयत्ता चौथीचा वर्ग. शिपाई काका वर्गात सूचना वही घेऊन आले. वहीत काय लिहिले असेल हे ऐकण्यासाठी मुले आतुर झाली होती. पाटोळे बाईंनी सूचना वाचली. मतदान असल्यामुळे शाळा दोन दिवस बंद राहील. मुलांना खूप आनंद झाला. पाटोळे बाईनी विद्यार्थ्यांना दोन दिवसांचा अभ्यास दिला.


अभय आनंदातच घरी आला. “आई, आई आम्हाला दोन दिवस सुट्टी आहे. बाईंनी खूप खूप अभ्यास दिलाय, तो मी लवकर करून घेणार आणि खूप मज्जा करणार!” आणि माझ्या मित्रांसोबत खेळणार.”
हो, हो, राजा, पहिला अभ्यास कर आणि त्यानंतर मित्रांसोबत खेळ. हातपाय धुऊन घे. जेवण करून घे आणि थोडा आराम कर.” हो, हो ...म्हणत उड्या मारत अभय खेळण्यासाठी बाहेर गेला.
जवळजवळ दोन तासांनंतर तो घरी आला. हातपाय धुतले, जेवण उरकले. आईची ही सगळी कामे आवरली होती. आई आज निवांत होती. अभय आईला म्हणाला ,“आई, आई, मला एक गोष्ट सांग.” “हो, सांगते, मी तुला गोष्ट. आज शनिवार आहे. शनिवार म्हणजे मारुतीचा वार. आपल्या आवडत्या हनुमंताचा वार. आज तुला मी हनुमंताचीच गोष्ट सांगणार आहे.


श्रीरामांचा आवडता भक्त, शक्ती, युक्ती आणि भक्तीचे प्रतीक असणारा हनुमंत. याची रामरायावर फार श्रद्धा होती. रावणाच्या तावडीतून सीतामाईची सुटका त्यांनी केली. श्रीरामांना समुद्रावर सेतू बांधण्यासाठी मदत केली. हनुमंताची कथा ऐकताना अभय भारावून गेला होता. अभयने मध्येच विचारले, “आई, आई, हनुमंताला जास्त काय आवडते !”आई म्हणाली, हनुमंताला केळी फार आवडतात. गोष्ट ऐकता ऐकता अभय आईच्या कुशीत शांत झोपी गेला.
दोन दिवसांनंतर शाळा सुरू झाली. अभय शाळेतून घरी आला. घरी दप्तर ठेवून आई ,“मी खेळायला जातोय !” असं सांगून बाहेर निघून गेला.


आई सुद्धा काही कामानिमित्त बाहेर गेली होती. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. अजूनपर्यंत अभय घरीच आला नव्हता. तिचा जीव खाली वर झाला. बाहेर येऊन ती ‘अभय.... अभय... असे हाक देऊ लागली.
त्याच्या मित्रांना विचारू लागली. अभय तुमच्या घरी आला आहे का? परंतु अभय कोणत्याच मित्राच्या घरी गेला नव्हता. बाजूच्या बागेत जाऊन ती पाहू लागली. बाजूला असणाऱ्या केळीच्या बागेमध्ये अभय तिला बसलेला दिसला. अभय...अभय..., आईने दोन-तीन वेळा हाक दिली.


अगं, “आई मी इथे आहे.” केळीच्या वनात! अरे, केव्हापासून तिथे काय करतोयंस!” अगं आई, “तूच म्हणाली होतीस ना, हनुमंताला केळी फार आवडतात, मला वाटलं तो केळीच्या बनात आला असेल!” तिथे त्याची नि माझी भेट होईल, म्हणून येथे आलोय!” पण बघ ना, दुपारपासून आता ६ वाजत आले तरी तो काही इथे आला नाही. का आला नसेल, त्याला भूक लागली नसेल का?” असे विविध प्रश्न तो आईला विचारू लागला. आई म्हणाली, “बेटा, अरे, केळी आवडतात म्हणून तो काय केळीच्या बागेतच बसून राहील का?” अरे, रामरायाने त्याला वेगळं काहीतरी काम सांगितलं असेल, ते काम करण्यासाठी तो कुठेतरी बाहेर गेला असेल.” “सारखाच केळी खात राहील का, आवडतात म्हणून!”
आईचे उत्तर ऐकून तो आईकडे काही वेळ पाहतच राहिला आणि त्याने आईला घट्ट मिठी मारली. चल, संध्याकाळ व्हायला आली आहे. काळोख होईल, घरी चल.
आईच्या सकारात्मक उत्तराने अभयला फार आनंद झाला. तो आईसोबत घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन त्याने घडलेली हकीगत आपल्या मित्रांना सांगितली.
तात्पर्य :- जीवनात सकारात्मकता
फार महत्त्वाची असते.

Comments
Add Comment

राजकारणापलीकडचे दादा

महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळा ठसा उमटवणारा नेता अशी अजितदादांची ओळख होती. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे तगत

डिजिटल प्रतिकृती

तंत्रवेध,डॉ. दीपक शिकारपूर  डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एखादी भौतिक वस्तू किंवा प्रक्रियेचे तपशीलवार आभासी

आतापी-वातापीची कथा

महाभारतातील मोतीकण,भालचंद्र ठोंबरे पूराणात देवदेवतांच्या तसेच राक्षसांच्या विविध कथा आहेत. राक्षसांच्या

गर्दीतला एकटेपणा

संवाद ,निशा वर्तक जूबाजूला माणसांची गर्दी आहे. घरात तर आजूबाजूला अनेक चेहरे आहेत पण मोबाईलमध्येच व्यस्त आहेत.

जा तुझको सुखी संसार मिले...

नॉस्टॅल्जिया,श्रीनिवास बेलसरे ‘नील कमल’ नावाचा केदार शर्मा यांचा एक सिनेमा आला होता १९४७ साली. राज कपूर आणि

टीनेज मुलांशी वागण्याच्या प्रभावी स्ट्रॅटेजी

आनंदी पालकत्व,डाॅ. स्वाती गानू आपली आजकालची Gen Z अर्थात entitled teen म्हणजेच ज्यांना असं वाटतं की आम्ही सगळ्यात श्रेष्ठ