आरसा

कथा,रमेश तांबे

आश्रमातला एक शिष्य आपले शिक्षण पूर्ण करून घरी निघाला होता. गुरुवर्यांनी त्याला बोलावलं आणि म्हणाले, “तू तुझं शिक्षण व्यवस्थित पूर्ण केले आहेस. आता घरी जा आणि पुढील आयुष्य आनंदाने व्यतीत कर.” मग गुरुवर्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर गुरुवर्यांनी त्याला एक आरसा भेट दिला आणि म्हणाले, “बाळ या आरशामध्ये आपल्याला मनातलं दिसतं. या आरशाचा तुला पुढील जीवनात खूप फायदा होईल. हा आरसा तुला मार्गदर्शक ठरेल.” ते ऐकून शिष्याला खूप आनंद झाला. गुरू निघून गेल्यावर शिष्याने विचार केला, चला सर्वात आधी आपण आपल्या गुरुवर्यांच्या मनात काय आहे ते तरी पाहूया. गुरुवर्यांनी आपल्याला एवढं शिक्षण दिलं; अगदी नि:स्वार्थी भावनेने दिलं. त्यांच्या मनात काय आहे ते तरी पाहूया. असं म्हणून त्याने गुरुवर्यांच्या मनात पाहिलं तर, त्यांच्या मनामध्ये खूप राग, लोभ आणि स्वार्थ त्याला दिसला. शिष्याला आश्चर्य वाटलं. अरेच्चा आपण आपल्या गुरूंना तर आदर्श मानत होतो. पण त्यांचे मन किती वाईट गोष्टींनी भरलेले आहे हे पाहून शिष्य अगदी हिरमुसून गेला. मग त्याने त्याच्या जीवलग मित्राच्या मनात पाहिलं तर त्याचेही मन खूप वाईट गोष्टींनी भरलेलं होतं. शिष्य खूप निराश झाला अन् तसाच घरी निघाला, सोबत गुरूंनी दिलेला आरसा घेऊन!
आता रस्त्यातून जाता-येता त्याला अनेक माणसे दिसली. तो प्रत्येकाच्या मनातलं पाहू लागला. त्याला सगळ्यांचीच मने अगदी राग, लोभाने, द्वेषाने भरलेली दिसली. प्रवास करता करता तो आपल्या घरी पोहोचला. समोर त्याचे बाबा बसले होते. त्याला वाटलं आपले बाबा आपल्यासाठी किती कष्ट करतात, मेहनत घेतात, पैसा खर्च करतात. आपल्याला शिक्षणासाठी त्यांनी एवढे दूर पाठवले. त्यांचं मन अगदी निर्मळ असणार. मग त्याने बाबांच्या मनातलं पाहिलं. तर बाबांचे मनदेखील वाईट गोष्टींनी भरलेलं होतं. मनात राग आणि द्वेष भरलेला होता. ते पाहून शिष्याला खूपच वाईट वाटलं.


तेवढ्यात त्याची आई घरात आली. त्याला खूप आनंद झाला. त्याला वाटलं आपली आई या जगातील सगळ्यात चांगली आई आहे. तिचं मन तर नक्कीच स्वच्छ, निर्मळ आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेलं असणार. म्हणून त्यांनं आईच्या मनात पाहिलं तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण आईचं मनदेखील स्वार्थाने भरलेलं होतं. तिच्याही मनात नको नको त्या वाईट गोष्टी होत्या. आता मात्र शिष्य अगदीच निराश झाला. खरंच सारं जग असं राग, लोभ अन् स्वार्थाने भरलेलं असेल तर काय उपयोग अशा जगात राहून. अन् त्याच निराशेच्या भरात तो गुरूंना भेटायला परत आश्रमात आला.


शिष्य आश्रमात आल्यावर लगेचच आपल्या गुरूंना भेटला आणि म्हणाला, “गुरुवर्य, हा आरसा मला नको. तो तुम्ही परत घ्या. शिष्याचे बोलणे ऐकून गुरूंना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘‘अरे हा आरसा खूप चांगला आहे. तो तुझे जीवन आदर्शवत बनवेल.” ते ऐकून शिष्य म्हणाला, होय गुरुवर्य मी इथे प्रत्येकाच्या मनात पाहिलं तर सगळ्यांचीच मनं अगदीच द्वेषानं, रागानं, स्वार्थानं आणि लोभानं भरलेली मला दिसली. मी अगदी निराश झालो आहे गुरुवर्य! मग गुरुवर्य हसत हसत आपल्या शिष्याला म्हणाले, “अरे बाळा हा आरसा तुला दुसऱ्यांच्या मनातलं बघण्यासाठी नाही दिला. स्वतःच्या मनात बघ आणि मग त्यात जे काय वाईट तुला दिसेल ते बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तू एक चांगला माणूस होशील.” गुरुवर्यांच्या या एका वाक्याने शिष्य अगदी चकीतच झाला. कारण त्या एका वाक्याने शिष्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. खरंच मित्रांनो आपण इतरांना दोष देत राहतो, इतरांचे दोष शोधत राहातो. पण खरं तर आपण स्वतःच निर्मळ आणि आनंदी मनाचे झालो तर सारेच जग आपल्याला आनंदी आणि चांगलेच दिसेल नाही का!

Comments
Add Comment

समाजमाध्यमांच्या आहारी...

दखल : मंजिरी ढेरे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‌‘सोशल मीडिया‌’ वापरावर

जादू जेवर विमानतळाची

पैलू : अजय तिवारी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एव्हिएशन क्षेत्रातील ‌‘आर्थिक गळती‌’ थांबवण्याचा लक्षवेधी

गावची जत्रा - आठवणींचा दरवळ

स्मृतीगंध : लता गुठे वेळ दुपारची, एसी गाडीतही जाणवणारं रणरणतं ऊन, डांबरी सडकेवर खेळणारं मृगजळ आणि रस्त्याच्या

‘उठो, हमारा सलाम ले लो’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ‘मुगले आझम’(१९६०)मध्ये दिलीपकुमार (सलीम उर्फ जहांगीर) आणि मधुबाला (अनारकली)

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर गावाचं गावपण राखून असलेलं बोर्डी हे डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य गाव. भारत

ब्रह्मचर्य व गृहस्थ धर्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे भारतीय परंपरेत मानवी जीवन चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम,