जा तुझको सुखी संसार मिले...

नॉस्टॅल्जिया,श्रीनिवास बेलसरे

‘नील कमल’ नावाचा केदार शर्मा यांचा एक सिनेमा आला होता १९४७ साली. राज कपूर आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचे कथानक म्हणजे एक रोमांटिक प्रेमकथा होती.
त्यानंतर २१ वर्षांनी दुसरा ‘नील कमल’ आला १९६८ साली. दिग्दर्शक होते राम माहेश्वरी, कथा एकेकाळचे अत्यंत लोकप्रिय कादंबरीकार गुलशन नंदा यांची! त्यांच्या कादंबऱ्या मिळण्याचे खात्रीचे ठिकाण म्हणजे रेल्वेस्टेशनवरचा ए. एच. व्हीलर यांचा स्टॉल! सुंदर रंगीत चित्रमय कव्हर असलेल्या त्यांच्या कादंबऱ्या प्रचंड खपत. अनेकजण गाडीची वाट पाहताना स्टॉलवर जाऊन त्या कादंबऱ्या विकत घेता येत नसतील तरी हाताळून बघत इतकी त्यांची कव्हर्स आकर्षक असायची!


‘अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे लोकप्रिय दिग्दर्शक असलेल्या फणी मुझुमदार यांनी नील कमल’ची पटकथा लिहिली होती. प्रमुख भूमिकेत वहिदा रेहमान, मनोजकुमार आणि राजकुमार होते. सोबत होते बलराज सहानी, ललिता पवार, मेहमूद आणि शशिकला.
सिनेमा चांगला चालला. त्यावर्षीच्या सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सिनेमात त्याचा क्रमांक तिसरा होता. ‘बिनाका गीतमाला’च्या गाण्यांच्या लोकप्रियतेच्या वर्गवारीत ‘नील कमल’च्या एका गाण्याला २३ वा क्रमांक मिळाला होता. याशिवाय नील कमलला ‘सर्वोत्कृष्ट सिनेमा’चा पन्नालाल माहेश्वरी यांना,‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनचा’ राम माहेश्वरींना, सहाय्यक अभिनेता म्हणून राजकुमारला, सहाय्यक अभिनेत्री म्हणून शशिकलाला, विनोदी अभिनेता म्हणून मेहमूदला, सर्वोत्तम गायकाचा महंमद रफीला आणि सर्वोत्तम कथालेखनाचा गुलशन नंदांना अशी तब्बल ७ फिल्मफेयर नामांकने मिळाली होती. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे त्यावर्षीचे फिल्मफेयर पारितोषिक मात्र पटकाविले वहिदा रहमानने!
जुन्या अनेक सिनेमाप्रमाणे कथा होती अपुऱ्या राहून गेलेल्या प्रेमिकांच्या पुनर्जन्माची. कॉलेजच्या ट्रीपला गेलेल्या सीताला (वहिदा) झोपेत चालण्याची सवय असते. ती चुकून धावत्या रेल्वेखाली येणार इतक्यात तिला राम (मनोजकुमार) वाचवतो. त्यामुळे सीताचे वडील आपल्या मुलीचा जीव वाचवणाऱ्याशी तिचे लग्न लावून देतात. दोघांचे एकमेकावर निस्सीम प्रेम असते.
परंतु प्रत्यक्षात सीताचा हा जन्म म्हणजे एक पुनर्जन्म असतो आणि ती मागच्या जन्मी राजकन्या ‘नील कमल’ असते. मागच्या जन्मी ‘चित्रसेन’ (राजकुमार) नावाच्या मूर्तीकाराचे तिच्यावर जीवापाड प्रेम असते. तिची हुबेहूब मूर्ती बनवल्याबद्दल खूश होऊन राजा जेंव्हा ‘तुला काय बक्षीस देऊ?’ असे त्याला विचारतो तेंव्हा तो राजकन्येशी लग्नाची इच्छा व्यक्त करतो. त्या विचित्र मागणीने संतापून जाऊन राजाने त्याला भिंतीत जिवंत चिणण्याची शिक्षा दिलेली असते.
सीताच्या झोपेत चालण्याच्या सवयीचा संबंध या पूर्वजन्मातील नात्याशी असतो. रोज रात्री तिला एक गाणे ऐकू येते कारण भिंतीत चिणलेला चित्रसेनचा आत्माच तिला एका ‘हॉण्टिंग गाण्याच्या’ माध्यमातून जिथे त्याला चिणले गेले तिथे बोलावत असतो. एक दिवस नकळत सीता तिकडे ओढली जाते आणि चित्रसेनाच्या आत्माशी संवाद होऊन तिला मागच्या जन्मीची सगळी शोकांतिका समजते. तिला त्या प्रेमाची आठवण होऊन ती त्याला म्हणते मीही माझा जीव द्यायला तयार आहे म्हणजे आपण पुन्हा एकत्र येऊ शकू. मात्र फक्त तिच्यापासून राजाने लपवलेले सत्य तिला कळावे आणि तिच्या प्रेमाची पावती मिळावी एवढीच त्याची अपेक्षा असते. चित्रसेनाचा त्याच जन्मात अडकलेला आत्मा प्रेमासाठी त्यागाची भूमिका घेऊन मुक्त होतो. त्यावेळी मनोजकुमार तिथे पोहोचतो आणि सीताचा आत्मा या जन्मात येऊन दोघांची परस्पर प्रेमाची स्मृती जागृत होऊन कथेचे रूपांतर सुखांतिकेत होते.
नील कमलमधील बिनाका गीतमालात लोकप्रियतेचा २३ वा क्रमांक मिळवणारे गाणे तसे मुलीच्या पाठवणीच्या वेळी प्रत्येकच भारतीय पित्याच्या मनात होणाऱ्या या घालमेलीचा सुंदर अविष्कार होते. बलराज सहानी वहिदाला सासरी पाठवताना या गाण्यातून आपल्या भावना व्यक्त करतात असा सीन होता. साहीरजींचे ते वत्सल शब्द होते -
‘बाबुलकी दुआएँ लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले.


मैकेकी कभी न याद आए, ससुरालमें इतना प्यार मिले.’
प्रत्येक पित्याला वाटत असते की, मुलीला सासरी सर्व सुखे मिळावीत. तिने पतीबरोबर, त्यांच्या कुटुंबांबरोबर इतके सुखी व्हावे की तिला माहेरची आठवणही येऊ नये; परंतु मुलीच्या निरोपाच्या वेळी पित्याला तिच्या लहानपणाच्या आठवणी घेरून टाकतात. आपली कन्या तान्हे बाळ असताना आपण तिची काळजी घेतली, कसे तिला हळुवारपणे हातातच झुलवले, एखाद्या नाजूक फुलासारखे सांभाळले ती दृश्ये आईसारखीच बापाच्या डोळ्यांसमोरही तरळलात. त्याचेही डोळे पाणावतात पण तो आईसारखे मोकळेपणे रडू शकत नसतो. तशा मन:स्थितीतही आई-वडील स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून ‘तुझा संसार सतत फुलत राहो’ असाच आशीर्वाद मुलीला देतात -
‘नाज़ोंसे तुझे पाला मैंने, कलियोंकी तरह फूलोंकी तरह,
बचपनमें झुलाया है तुझको, बाँहोंने मेरी झुलोंकी तरह,
मेरे बागकी ऐ नाजुक डाली, तुझे हरपल नई बहार मिले.’
पित्याला वाटते आपल्या मुलीचे स्थान तिच्या घरात महत्त्वाचे राहावे. तिच्या सासरी तिचेच राज्य चालावे. बिचाऱ्यांना भविष्यात काय होणार ते माहीत नसल्याने दोघे जणू देवाकडे प्रार्थनाच करत असतात की ‘देवा, तिच्या चेहऱ्यावर सतत स्मित हास्य झळकत राहू दे, तिच्यावर सर्व सुखांचा वर्षाव होत राहो. तिचे रूप तिच्या पतीला कायम प्रेमाने बांधून ठेवेल इतके सुंदर राहु दे.’


‘जिस घरसे बंधे हैं भाग तेरे, उस घरमें सदा तेरा राज रहे,
होठोंपे हँसीकी धूप खिले, माथेपे खुशीका ताज रहे.
कभी जिसकी ज्योत न हो फीकी, तुझे ऐसा रूप-सिंगार मिले.’
पिताचे मन प्रार्थना करत राहते ‘माझ्या मुलीला नेहमी सुखमय जीवन लाभो, तिला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागू नये. जीवनपथावर तिला कधी एखादा काटाही न टोचो. केवळ तिच्याच नाही तर तिच्या सर्वच नात्यांना सुख लाभो, सर्व दु:खे त्यांच्यापासून दूर राहोत.’
‘बीतें तेरे जीवनकी घड़ियां आरामकी ठंडी छाँवमें,
काँटा भी न चुभने पाए कभी, मेरी लाडली तेरे पाँवमें,
उस द्वारसे भी दुख दूर रहे, जिस द्वारसे तेरा द्वार मिले.’
खरे तर साहीरसाहेबांनी या गाण्यात ज्या सुंदर, वत्सल भावनांचे चित्रण केले तो काळ ५७ वर्षांपूर्वीचा! आता चित्र बदलले आहे. फक्त सुख साजरे करण्याच्या अतिरेकी सोसाशिवाय सर्वच मानवी भावना सुकून चालल्या आहेत. लग्नातच काय, स्मशानातही लोक ‘नॉर्मल’ असतात, रडतबिडत नाहीत. त्यामुळे रसरशीत मनस्वीपण अनुभवायचे असेल, तर अशा जुन्या गाण्यांना पर्याय नाही हेच खरे!

Comments
Add Comment

राजकारणापलीकडचे दादा

महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळा ठसा उमटवणारा नेता अशी अजितदादांची ओळख होती. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे तगत

डिजिटल प्रतिकृती

तंत्रवेध,डॉ. दीपक शिकारपूर  डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एखादी भौतिक वस्तू किंवा प्रक्रियेचे तपशीलवार आभासी

आतापी-वातापीची कथा

महाभारतातील मोतीकण,भालचंद्र ठोंबरे पूराणात देवदेवतांच्या तसेच राक्षसांच्या विविध कथा आहेत. राक्षसांच्या

गर्दीतला एकटेपणा

संवाद ,निशा वर्तक जूबाजूला माणसांची गर्दी आहे. घरात तर आजूबाजूला अनेक चेहरे आहेत पण मोबाईलमध्येच व्यस्त आहेत.

टीनेज मुलांशी वागण्याच्या प्रभावी स्ट्रॅटेजी

आनंदी पालकत्व,डाॅ. स्वाती गानू आपली आजकालची Gen Z अर्थात entitled teen म्हणजेच ज्यांना असं वाटतं की आम्ही सगळ्यात श्रेष्ठ

सकारात्मकता

जीवनगंध,पूनम राणे खेडेगावातील शाळा, निसर्गरम्य वातावरण. आजूबाजूला नारळी, पोपळी काजू, आंबे, केळी यांच्या