टीनेज मुलांशी वागण्याच्या प्रभावी स्ट्रॅटेजी

आनंदी पालकत्व,डाॅ. स्वाती गानू


आपली आजकालची Gen Z अर्थात entitled teen म्हणजेच ज्यांना असं वाटतं की आम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहोत आणि आमच्या इच्छा आणि गरजा यांना सगळ्यात आधी प्राधान्य द्यायला हवं. इतरांच्या प्रयत्नांची, कष्टांची त्यांना जाणीव नसते. ते समजतात इतर लोक जणू आपली सेवा करण्यासाठीच आहेत. बाहेर ते अतिशय जबाबदारीने आणि छान वागतात, पण घरात मात्र परिस्थितीचा फायदा घेण्यात ते हुशार आणि तरबेज असतात. हा आपला हक्कच आहे असं वाटून घेण्याची मानसिकता या मुलांची असेल, तर त्या मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. मुलांना निराशा, एकटेपण जाणवते. त्यातूनच मग खोलीत स्वतःला जणू कोंडून घेणं सुरू होतं. कारण आपल्या गरजा कशा पूर्ण कराव्यात हे त्यांना कळत नाही आणि इतरांच्या अपेक्षा मुलं पूर्ण करू शकत नाही. यातूनच इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न मुलं करू लागतात, कारण मनातून ते जणू रिकामे झालेले असतात. पालकांनो याचाच अर्थ असा आहे की, आपण आपल्या मुलांबाबत ओव्हर पॅरेंटिंग करतोय आणि या जगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना पूर्णपणे तयार करत नाही आहोत.


मुलं जेव्हा हा आमचा हक्कच आहे असं समजतात तेव्हा हा माईंडसेट धोकादायक ठरू शकतो. अशा माईंडसेटचे टीनेजर्स तयार करायचे नसतील तर या गोष्टी लक्षात ठेवू या


१) मुलांना स्वतः कमाई करण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांना वस्तूची किंमत कळायला हवी असे जर तुम्हाला वाटत असेल, तर एखादा आठवडा मुलांना घराची छोटीशी का होईना आर्थिक जबाबदारी सोपवू शकता. मुलांना पुढील महिन्यात घेऊ इच्छिणाऱ्या आवडत्या वस्तूच्या खरेदीसाठी किमान २५% रकमेची बचत करायला सांगू शकता. आपण मुलांना वारेमाप खेळणी, गॅजेट्स, वस्तू घेऊन देत असू, तर मग हळूहळू त्यांना हा आपला हक्कच आहे असे वाटू शकते. यासाठीच मुलं टीनेजमधील असल्याने सुट्ट्यांमध्ये माफक प्रमाणात काम व कमाई करू देत म्हणजे कामाचे कष्ट आणि पैशाची कमाई याचे महत्त्व मुलांना कळेल.


२) मुलांना अपयशी होऊ द्या.खूप पालकांना हे वाक्य ऐकायला आणि पचवायला जड जाईल. पण या जगात कसं जगलं पाहिजे, नाही तर कोणते परिणाम होऊ शकतात, या गोष्टींची जाणीव मुलांना व्हायलाच हवी. याशिवाय परिस्थितीशी जुळवून कसे घ्यायचे याचं भान त्यांना येणार नाही. जेव्हा तुम्हाला हे दिसू लागेल की ते परिस्थितीशी झटापट करत आहेत तेव्हा जरूर तुम्ही त्यात उडी घ्या, त्यांना मदत करा. उदाहरणार्थ अभ्यासातील ग्रेड्स मिळवण्यासाठीच्या अडचणी किंवा वागण्याचे प्रश्न याबाबत तुम्ही त्यांना मदत करू शकता. पण अपयश आले तर काय परिणाम होतात तेही त्यांना कळूच दे. कारण सतत मदत करण्याने आपण त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी अडथळे तयार करत असतो हे लक्षात ठेवा.
अपयश हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मुलांना तयार करणारा एक असा मार्ग आहे जो त्यांच्या कृतीच्या, वागण्याच्या परिणामांची जाणीव मुलांना देतो. म्हणून अपयशाकडे सकारात्मक पद्धतीने बघा. आपण प्रयत्न केले नाहीत, योग्य तो सराव केला नाही तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे कळले की मग मुलं योग्य त्या पद्धतीने रोज अभ्यास करू लागतील. अपेक्षित वागणं का आवश्यक आहे हे त्यांना लक्षात येईल.
वही विसरणं, प्रोजेक्ट अपूर्ण ठेवणं, पुरेसा अभ्यास न केल्याने टेस्टमध्ये नापास होणे यातून हे परिणाम त्यांच्या लक्षात येतील आणि त्यांना कळेल की, आपण जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर दुसऱ्यावर ब्लेम करून उपयोग नाही. यामुळे आपण फेल्युअर ठरणार आहोत. मुलं अपयशी व्हावीत किंवा झाली, तर यासाठी तुम्ही जबाबदार नाही पालकांनो. तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांना प्रॉब्लेम सोडवायला मदत करायला उपलब्ध नसणार आहात. तुम्ही फक्त फॅसिलिटेटर अर्थात त्यांना प्रेरणा देऊ शकता. अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकता. अपयश आले की मुले अंतर्मुख होऊन विचार करू लागतील आणि त्यामुळे मुलं स्वतःमधील गुणवैशिष्ट्ये, ताकद आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता शोधू आणि वापरू शकतील.
३) घरातील जबाबदाऱ्या आणि मुलांची सेल्फ सफिशियन्सी मुलांवर सोपवायला हवी. यासाठी मुलांना उत्तेजन द्यायला हवं. या वयातील मुलं स्वतःहून मोटिवेट होत नाहीत. कधी कधी तर ती आपल्याला चक्क आळशी वाटतात. काही वर्षांनंतर तुमची ही पाखरे आपल्या घरट्यातून दूर उडून जाणार आहेत. तत्पूर्वीच आपण त्यांना स्वतंत्र जगात जगण्याची कौशल्ये शिकवणं आवश्यक आहे. मगच ते पुढे आत्मविश्वासाने जाऊ शकतील. स्वतःची काळजी घेऊ शकतील. आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीबाबत आपण अकाउंटेबल आहोत याची जाणीव त्यांना द्या. एवढंच नव्हे तर या गोष्टींची जबाबदारी न घेतल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव द्या. एका विशिष्ट वयानंतर किंबहुना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना कामं सोपायलाच हवीत. मुलं आळशीपणा करतात, कामचुकारपणाने वागतात म्हणून त्यांच्या मागेही लागावं लागतं. पण किती दिवस आपण मुलांचे काम करणार आहोत. सगळं आयतं हातात देणं, रूम सर्विस देणं ताबडतोब बंद करा. तुमच्या मुलांकडून असणाऱ्या अपेक्षा स्पष्टपणे त्यांना सांगा. होमवर्क आणि इतर कामांचा बहाणा करून ते कामे टाळतात. पुढे ढकलतात पण तुम्ही ठाम राहा. काम पूर्ण न झाल्यास मुलांना दिल्या जाणाऱ्या सुख-सुविधांमध्ये कपात करा. याचा अर्थ सारख्या सूचना द्या, मागे लागा असा नाही पण एकदा स्पष्ट शब्दात सूचना द्या.


४) मुलांसाठी बाउंड्रीज आखा.
मुलांच्या चुकीच्या वागण्याला प्रतिबंध करण्यासाठी नियम तयार करून पाळायला लावणे, बाउंड्री चाकण जबाबदाऱ्या टाकणं हे यासाठी अँटी डॉट्स आहेत. मुलांना जसा आपला मालकी हक्क समजतो, तर तशी जबाबदारीही त्यांनी घ्यायला हवी. टीनेजर मुलांना त्यांचं सोशल मीडियावर अकाउंट नसेल तर जणू आयुष्य संपून गेल्यासारखं वाटतं. किंवा एखाद्या कॉन्सर्टला जाता आलं नाही, रात्री उशीरापर्यंत थांबता आलं नाही, फॅशनेबल कपडे घालता आले नाहीत की आयुष्यात काही आनंद नाही असं त्यांना वाटतं. या गोष्टींसाठी त्यांना परवानगी मिळावी म्हणून ते मागे लागतील. स्वतःची बाजू मांडतील आणि या गोष्टींचा उपयोग होत नाही हे लक्षात आलं, की मग तुम्हाला मुद्दामच टाकून बोलतील. इमोशनल ब्लॅकमेल करतील.खरं म्हणजे तुम्ही पालक म्हणून आतापर्यंत मुलांना चांगले संस्कार दिलेले असतात. पण या वयात मात्र मुलांना या जगात टिकण्यासाठी तयार करणे हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. पालकांनी त्यामुळे अशावेळी जेव्हा मुलं तुमच्याकडे हट्ट करतात तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करतात तेव्हा ग्रेसफुली तरीही प्रेमाने मुलांसाठी मर्यादा हव्यात. एकदा नाही म्हणालात, तर त्यावर ठाम राहा. आपलं मत बदलू नका. मुलांबरोबर संघर्ष टळावा म्हणून नाहीला थोड्या वेळाने हो म्हणू नका.


५) मुलांमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना निर्माण करा.
टीनेजर वयातील मुलं बहुधा छोट्या-छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करत नाहीत. या गोष्टी त्यांना फार महत्त्वाच्या वाटत नाहीत. बाकीचे लोक जणू त्यांच्यासाठी काम करायलाच आहेत असं त्यांना वाटतं. मात्र त्यांना स्वतःला ताबडतोब ग्रॅटिफिकेशन हवे असते, म्हणूनच मुलांना कृतज्ञता व्यक्त करायला त्यांच्या मनात तसा एटीट्यूड तयार करायला हवा. जगात किती माणसे दुःख, वेदना सहन करून आपल्या आयुष्यात संघर्ष करत असतात याची जाणीव त्यांना द्यायलाच हवी. यासाठी अशा डॉक्युमेंटरी, पुस्तकं मुलांना बघायला आणि वाचायला प्रवृत्त करा. आपण समाजाचं काही देणं लागतो हे त्यांच्याशी तुम्ही बोलताना जरूर मांडा. तुमच्या स्वतःच्या वागण्यातून मुलांसमोर आदर्श ठेवा. तुमची पहिली नोकरी तुमचा पगार तुम्ही केलेला संघर्ष याबद्दल बोला. संध्याकाळी किंवा रात्री जेवणानंतर त्यांना फिरायला घेऊन जा. चालता चालता त्यांच्याशी या गप्पा जरूर मारा. म्हणूनच पालकांनो हे सारं मला मिळालंच पाहिजे, हे माझ्या मालकीचे आहे असा भाव मनात पोसणारी मुलं आपल्याला मोठी करायची नाहीत, तर एक असा माणूस याच्यावर तुम्ही प्रेम कराल, तो तुम्हाला आवडेल, त्याचा आदर कराल असं मूल तुम्हाला घडवायचं आहे. अजूनही उशीर झाला नाही. प्रेम द्या, पण थोडं कणखरपणेच. विश्वास ठेवा पालकांनो, आज हे सारं मुलांना आवडलं नाही तरी ते जेव्हा मोठे होतील, तेव्हा तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने मोठं केलं त्याबद्दल ते तुम्हाला नक्कीच एप्रिशिएट करतील.

Comments
Add Comment

राजकारणापलीकडचे दादा

महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळा ठसा उमटवणारा नेता अशी अजितदादांची ओळख होती. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे तगत

डिजिटल प्रतिकृती

तंत्रवेध,डॉ. दीपक शिकारपूर  डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एखादी भौतिक वस्तू किंवा प्रक्रियेचे तपशीलवार आभासी

आतापी-वातापीची कथा

महाभारतातील मोतीकण,भालचंद्र ठोंबरे पूराणात देवदेवतांच्या तसेच राक्षसांच्या विविध कथा आहेत. राक्षसांच्या

गर्दीतला एकटेपणा

संवाद ,निशा वर्तक जूबाजूला माणसांची गर्दी आहे. घरात तर आजूबाजूला अनेक चेहरे आहेत पण मोबाईलमध्येच व्यस्त आहेत.

जा तुझको सुखी संसार मिले...

नॉस्टॅल्जिया,श्रीनिवास बेलसरे ‘नील कमल’ नावाचा केदार शर्मा यांचा एक सिनेमा आला होता १९४७ साली. राज कपूर आणि

सकारात्मकता

जीवनगंध,पूनम राणे खेडेगावातील शाळा, निसर्गरम्य वातावरण. आजूबाजूला नारळी, पोपळी काजू, आंबे, केळी यांच्या