लेखक ‘भूमिका’ जगतो तेव्हा...

राजरंग : राज चिंचणकर


कोणत्याही कलाकृतीच्या सादरीकरणाच्या मागे अनेक विभाग आणि व्यक्ती कार्यरत असतात. लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या आणि अशा अनेक मंडळींचे त्या कलाकृतीच्या निर्मितीमागे कष्ट असतात. मात्र ती कलाकृती रसिकांसमोर सादर होताना त्या कलाकृतीच्या लेखकाला दुर्लक्षिले जाते; अशी चर्चा कलाक्षेत्रात कायम सुरू असते. वास्तविक, लेखक हा त्या कलाकृतीचा जन्मदाता असतो; मात्र नंतरच्या काळात याच लेखकाचा संबंधित मंडळींना विसर पडल्याची ओरड नेहमी होत असते. याच पार्श्वभूमीवर काही ठोस भाष्य करणाऱ्या 'आत्मचरित्र' आणि 'वार्ता लिफ्ट' या दोन एकांकिका सध्या मराठी रंगभूमीवर लक्ष वेधून घेत आहेत. 'लेखक' नामक महत्त्वाच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवत, हे दोन प्रयोग सध्या रंगभूमीवर काही सांगू पाहत आहेत. यातून लेखकाचे 'भूमिका' म्हणून जगणे प्रकर्षाने दृगोच्चर होत आहे.


या दोन एकांकिकांपैकी 'आत्मचरित्र' या एकांकिकेचे लेखन दीपक कुलकर्णी यांनी १९८८ मध्ये केलेले आहे; तर 'वार्ता लिफ्ट' ही एकांकिका वैभव पाटील यांनी यावर्षी लिहिली आहे. दीपक कुलकर्णी यांची 'आत्मचरित्र' ही एकांकिका त्याकाळी खूप गाजली होती. एक लेखक एका आडगावात, वीस वर्षे एका वाड्यात नोकरासोबत राहत आहे. प्रसिद्धी, पैसा, सन्मान यापासून तो खूप लांब आहे. पण आपल्या भूतकाळापासून पलायन करण्याकरता त्या लेखकाने चित्रकला जवळ केलेली आहे. त्याचे बोध मन म्हणत आहे की आत्मचरित्र लिही; पण अबोध मनातल्या त्याच्या आठवणी त्याला त्रास देत आहेत. आत्मचरित्र लिहिताना स्वतःशी प्रतारणा करावी लागेल म्हणून हा लेखक शेवटपर्यंत आत्मचरित्र लिहीत नाही. असा आशय असलेली ही एकांकिका तिच्या शक्तिशाली आशयामुळे मनाची पकड घेते. नीलेश पवार, राजन काजळरोकर आदी कलाकार यात भूमिका साकारत आहेत. अशीच, 'लेखक' या विषयाशी संबंध असलेली दुसरी एकांकिका म्हणजे 'वार्ता लिफ्ट'. ही एकांकिका वैभव पाटील या युवा लेखकाने लिहिली आहे. आजची पत्रकारिता व मुलाच्या आजारपणासाठी प्रकाशकाला पुस्तके विकणारा लेखक यांच्या आयुष्यातली हतबलता यात मांडली आहे. समाजातली आजची पत्रकारिता व लेखकाचे सामाजिक स्थान, हा या एकांकिकेचा पाया आहे. अभय धुमाळ, दिनार केळुसकर आदी कलाकार यात भूमिका रंगवत आहेत. या एकांकिकांची निवड आणि दिग्दर्शन महेंद्र डोंगरे यांनी केले असून, विषयांचे विविधिकरण शोधत असताना त्यांची कलाकार म्हणून असलेली सामाजिक बांधिलकी व नाटकाविषयीची कळकळ यातून दिसून येते.


एकूणच ही सगळी प्रक्रिया आणि प्रयोगांच्या निमित्ताने महेंद्र डोंगरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणतात, “एकांकिका ही केवळ रंगभूमीची एक शाखा नाही; तर समाजाच्या बौद्धिक, सामाजिक व कलात्मक जाणिवेचा तो आरसा आहे. इतिहास, सद्यस्थिती, सुवर्णकाळ आणि भविष्य असे तिचे चार टप्पे पाहिले, तर एक सुसंगत असा प्रवास दिसून येतो. १९७० ते १९९० हा काळ मराठी एकांकिकेचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. त्या काळात 'लेखन' हे केंद्रस्थानी होते. त्याचा साहित्यिक दर्जा उच्च होता. एकांकिका म्हणजे 'शॉर्टकट' नव्हता; तर ती एकप्रकारची कलात्मक जबाबदारी होती. त्या काळात, एकांकिका म्हणजे एका व्यक्तीच्या माध्यमातून संपूर्ण समाज बोलत असे. याच संदर्भाने, 'वार्ता लिफ्ट' आणि 'आत्मचरित्र' या दोन एकांकिका भाष्य करतात.


वास्तविक, हे सर्व मांडण्याचे कारण म्हणजे काळाच्या वेगवान प्रवाहात, जिथे 'रिल्स' हा प्रकार मानवी मनाचा भाग होत आहे; त्याचकाळात एकांकिकेचे विषयही एका वाक्यात सांगता येतील. पण शब्द फुगवटा ३५ ते ४० मिनिटे फुगवून एकांकिका सादर केल्या जात आहेत. त्यात मुख्य भाग कल्पनाविष्काराचा असतो. अशाच या प्रवाहात गोरेगाव, मुंबईची 'सोहम साधना ग्रुप' ही संस्था वेगळा प्रयोग करत आहे. गेल्या महिन्यात या संस्थेने 'विदूषक' या विषयावर दोन एकांकिका सादर केल्या होत्या. आता ही संस्था 'लेखक' या सामायिक विषयावर दोन एकांकिका करत आहे. वाचण्याऐवजी पाहण्यात रस घेणारा आजचा समाज आहे. एकेकाळी शब्दांची गारुडे घालणारी लेखक मंडळी समाजात अतिशय प्रतिष्ठा, मानसन्मान बाळगून होती. आज प्रवाहाच्या ओघात खाली ढकलला गेलेला लेखणीकार लेखक, नाटकाच्या दृकश्राव्य माध्यमातून तसूभरही उंचावला तरी माझी कल्पना सार्थकी लागली, असे मी समजेन.”

Comments
Add Comment

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.

ग्रामीण मनोरंजनासाठी ‘किस्सा शुरू टॉकीज’!

ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने नवीन चित्रपट पाहण्यासाठी

Deepa Sawant-Khot : मर्डर मिस्ट्रीची ‘तलास’

कलेची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यातून मार्ग काढून त्या कलेची

Usha Nadkarn : स्पष्ट बोलण्यास कारण की...

स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे मराठी कलाक्षेत्रात ज्या दोन व्यक्तींना प्रामुख्याने ओळखले जाते; त्या वक्ती

Shantecha Karta Chalu Aahe : लक्ष्मीकांत बेर्डे सर.. लक्ष असू द्या! प्रियदर्शन जाधवची भावूक पोस्ट

मुंबई : मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलेलं विनोदी नाटक 'शांतेचं कार्ट चालू आहे' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला