मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यांच्या सामाजिक, संस्थात्मक आणि राजकीय प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमी
सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे झाला. त्यांचे वडील कै. बाजीराव पाटील आणि यांच्याकडे १३ गावची पाटीलकी होती. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी (बी.कॉम.) प्राप्त केली आहे. सुनेत्रा पवार या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असून त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत.
सामाजिक व संस्थात्मक कार्य
- गेल्या २३ वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून बारामती परिसरात विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विकासाचे भक्कम जाळे उभे केले आहे.
- बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून त्यांनी ६ हजारांहून अधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
- ‘एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एक लाखांहून अधिक वृक्षांचे रोपण केले आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
- विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यासोबतच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच महिलांसाठी कर्करोग जनजागृती मोहिमा आयोजित केल्या आहेत.
- २५ जून २०२४ पासून त्या राज्यसभेच्या सदस्य (खासदार) म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांनी या पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
- संसदेत त्यांनी शिक्षण, महिला, बालके, युवक व क्रीडा विषयक स्थायी समितीवर काम केले आहे.
- मेक्सिको येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला संसद सदस्य परिषदेत त्यांनी भारतीय संसदेचे प्रतिनिधित्व केले आहे.मिळालेले सन्मान
सुनेत्रा पवार यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (२०२३), राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार (२०२४) आणि ग्रीन वॉरियर पुरस्कार यांचा समावेश आहे.