अलिबाग : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी युती-आघाडीच्या राजकारणात सर्वच पक्षांच्या वाट्याला कमी अधिक जागा आलेल्या असल्या, तरी जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचे सर्वाधिक ४० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुसरीकडे अनेक वर्षे शिवतीर्थावर राज्य करणारा आणि मागील निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे यावेळी केवळ १९ उमेदवारच निवडणूक रिंगणात आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यासाठी १७३ उमेदवार रिंगणात आहेत. आता पक्षनिहाय लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, जिल्ह्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केल्याने यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे महायुतीतील घटक पक्षांचे उमेदवार काही ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने उत्तर रायगडात भाजपबरोबर आघाडी केली आहे. तरीही शिंदेंच्या शिवसेनेने सर्वाधिक ४० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेपाठोपाठ भाजपने ३० मतदारसंघांत आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दक्षिण रायगडात भाजपबरोबर युती करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीत २९ जागांवर, तर शेकाप आणि शिवसेना ठाकरे गट यांनी प्रत्येकी १९ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत.
काँग्रेस पक्षाने ९ जागांवर उमेदवार दिले असून, मनसेने ३ मतदारसंघांत आपली उपस्थिती नोंदवली आहे. वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि भाकप यांनी केवळ एका जागेवर उमेदवार उभे केल्याने या पक्षांची भूमिका मर्यादित स्वरूपाची राहिली आहे, तर २१ अपक्ष उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. दरम्यान, राजिपवर सातत्याने सत्तेत राहणाऱ्या शेकापची यावेळी उमेदवार उभे करण्यात देखील पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणुकीत २३ जागा जिंकत शेकाप सत्तेतील प्रमुख घटक पक्ष बनला होता. यावेळी शेकापचे अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून अन्य पक्षात सामील झाले. त्यामुळे यावेळी शेकापने नवीन तरुण उमेदवारांना संधी दिली आहे.
अपक्षांना संधी
रायगड जिल्ह्यात सक्रिय असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अपक्षांना येथील निवडणुकांमध्ये फारसा वाव मिळताना दिसत नाही. मात्र यावेळच्या निवडणुकीत २१ अपक्ष उमेदवार उभे आहेत. यात राजकीय पक्षांच्या बंडखोर उमेदवारांचाही समावेश आहे. हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात. त्यातच जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी ३१ चा मॅजिक फिगर गाठण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे. अशावेळी सत्तासंघर्षात अपक्षांचाही भाव वाढण्याची शक्यता आहे.