Friday, January 30, 2026

कडोंमपा, उल्हासनगर, भिवंडीत यंदा महापौर व उपमहापौर निवड हात वर करून

कडोंमपा, उल्हासनगर, भिवंडीत यंदा महापौर व उपमहापौर निवड हात वर करून

आज ठाणे, कल्याण-डोंबिवलीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

ठाणे/ कल्याण/ डोंबिवली/ उल्हासनगर/ भिवंडी/ नवी मुंबई: कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेलसह आठ महापालिकांमध्ये महापौर व उपमहापौरपदाची निवड ३ ते १० फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहे. यंदा ही निवड गुप्त मतदानाऐवजी हात वर करून केली जाणार आहे. त्यामुळे सभागृहात बहुमत कुणाकडे आहे याची पाहणी करूनच महापौर, उपमहापौरांची घोषणा केली जाईल. संपूर्ण प्रक्रिया फक्त १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. बाजूने आणि विरोधात मतदान करणाऱ्यांची स्वाक्षरीसह नोंद विशेष सभेच्या कार्यवृत्तात केली जाईल. कोकण आयुक्तांनी नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून निवड प्रक्रिया पार पाडणार आहेत.

ठाण्यात महापौर कोण?

ठाणे महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी ३ फेब्रुवारी ठरले आहे. अर्ज ३० जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सचिव कार्यालयात स्वीकारले जातील. विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. भाजपकडून महापौरपदासाठी गणेश कांबळे आणि उषा वाघ यांची नावे पुढे आली आहेत तर शिवसेनेतून सात जणांची नावे पुढे आली आहेत. पद्मा भगत, वनिता घोगरे, विमल भोईर यांच्या नावांची चर्चा आहे. गणेश कांबळे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. डॉ. दर्शना जानकर, आरती गायकवाड, दीपक जाधव हेही शर्यतीत आहेत.

कडोंमपा : कडोंमपा महापौरपदासाठी इच्छुक नगरसेवक २९ व ३० जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. छाननीनंतर हे अर्ज ३ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता होणाऱ्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी सादर केले जातील. पीठासीन अधिकारी म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल नियुक्त आहेत. नवी मुंबईसाठी रणजीत यादव पीठासीन अधिकारी : नवी मुंबई महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवड ५ फेब्रुवारी होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांची नियुक्ती झाली आहे. नगर सचिव म्हणून उपायुक्त संघरत्ना खिल्लारे कार्य पाहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १ फेब्रुवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत आहे.

भाईंदर-महापौरपदासाठी मोर्चा : मीरा-भाईंदरमध्ये मराठी महापौर व्हावा या मागणीसाठी २ फेब्रुवारी रोजी सुभाषचंद्र बोस मैदानावर आंदोलन आणि ३ फेब्रुवारी रोजी सुभाषचंद्र बोस ते महापालिका मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे, मराठी एकीकरण समिती, सामाजिक संस्था आणि मंडळे या मोर्चात सहभागी होतील.

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवड ३ फेब्रुवारी होणार आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या देखरेखीखाली ही निवड पार पडणार आहे. ७८ नगरसेवकांच्या साक्षीने महापौर व उपमहापौरांची निवड केली जाईल. उल्हासनगरचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे.

भिवंडी महापौर निवड अधांतरी : भिवंडी महापालिकेतील महापौरपद सर्वसाधारण असून, अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. पालिका आयुक्त रजेवर असल्यामुळे अधिकृत माहिती मिळत नाही. त्यामुळे भिवंडी महापौर निवड अधांतरी आहे.

Comments
Add Comment