मेलबर्न :जागतिक क्रमवारीत नंबर १ टेनिसपटू अरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचा सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ असा सहज पराभव केला. मेलबर्नमध्ये सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. पहिल्या सेटमध्ये सामना सुरू असतानाच एक नाट्यमय आणि वादग्रस्त प्रसंग घडला. सामन्याच्या चौथ्या गेमच्या पहिल्याच पॉइंटवर साबालेंकाने बॉल रिटर्न केला, परंतु तिची 'ग्रंट' (आवाज) उशिरा आली. स्वितोलिना शॉट खेळणार असताना हा उशिरा आलेला आवाज झाल्याचे पंचांनी ठरवले. या 'हिंडरन्स' नियमाखाली पंचांनी साबालेंकाला थेट 'पॉइंट पेनल्टी' दिली. सबालेन्काने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली, मात्र निर्णय कायम राहिला. विशेष म्हणजे, या वादग्रस्त निर्णयामुळे साबालेंका आणखी पेटून उठली. तिने त्याच गेममध्ये स्वितोलिनाची सर्व्हिस ब्रेक केली आणि पहिला सेट सहज जिंकला. या स्पर्धेत अद्याप एकही सेट न गमावणाऱ्या सबालेन्काने आपला दबदबा कायम ठेवला आहे. शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात तिचा सामना एलिना रायबाकिना आणि जेसिका पेगुला यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.