ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महापौर पदासाठीची निवडणूक जाहीर झाली असून, ३० जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत तर ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची बातमी समजताच त्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने, महापौर निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अद्याप शासनाकडून कोणतेही अधिकृत निर्देश न आल्याने निवडणूक वेळापत्रक कायम राहण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
गेली तीन वर्षे रखडलेली ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत ५५ टक्के इतके मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तीन टक्के कमी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी एकूण ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामुळे १२५ जागांसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी शरद पवार गट १२, राष्ट्रवादी अजित पवार गट ९, एमआयएम ५, शिवसेना उबाठा १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत.
ठाणे महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ६६ नगरसेवकांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणत बहुमताचा आकडा पार केला आहे. शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढविली असली तरी, शिंदेच्या शिवसेनेकडे सत्तास्थापनेइतका बहुमताचा आकडा असल्याने त्यांच्या पक्षाचा महापौर होईल, अशी शक्यता आहे.
मागील आठवड्यात महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाले. यामध्ये अनुसूचित जाती प्रवगार्साठी आरक्षित झालेल्या या पदासाठी शिवसेना शिंदे गटातून सात जणांची नावे पुढे आली आहेत. या सातपैकी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच, महापौर पदासाठी ३ फेब्रुवारी रोजी निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी ३० जानेवारी रोजी अर्ज भरण्याची मुदत आहे. या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच, बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची घटना घडली.
यामुळे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने महापौर निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, शासनाकडून याबाबत कोणतेही निर्देश आलेले नसल्यामुळे या निवडणुका वेळेतच होण्याचा अंदाज प्रशासकीय सुत्रांनी व्यक्त केला आहे. तसेच शासनाकडून निर्देश आले तर मग निवडणुका लांबणीवर पडू शकतात, असेही प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.






