Thursday, January 29, 2026

श्री मलंगगड यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

श्री मलंगगड यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

अप्पर आयुक्तांकडून सुरक्षेचा सखोल आढावा

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगड यात्रेला माघ पौर्णिमेनिमित्त सुरुवात होत आहे. या यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी सर्व यंत्रणांचा सखोल आढावा घेतला. यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित बैठकीत पोलीस, महसूल, महावितरण, आरोग्य आणि वाहतूक विभागासह विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी व वंशपरंपरागत ट्रस्टी उपस्थित होते. संपूर्ण यात्रा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असेल. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वात मोठा फौजफाटा हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तैनात करण्यात आला आहे. नेवाळी ते श्री मलंगगड मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळामार्फत जादा बस सोडण्यात येणार आहेत.

वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणला सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि पाणीपुरवठा यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी गडाच्या पायथ्याशी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जया एकादशीच्या पहाटे वंशपरंपरागत पुजारी अॅड. विजय केतकर यांच्या निवासस्थानावरून पालखीचे प्रस्थान होईल. माघ पौर्णिमेच्या मुख्य दिवशी गडावर पालखी सोहळा पार पडणार असून, देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Comments
Add Comment