कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आयुक्तांचे आवाहन
पनवेल : महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत “प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना”साठी विशेष नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. ही मोहीम १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले. या योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांना देण्यात येत असून यामध्ये रिक्षाचालक, फेरीवाले, छोटे व्यापारी, घरगुती कामगार,शेती कामगार, बांधकाम कामगार, हातमाग कामगार आदींचा समावेश आहे. लाभार्थ्यांचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असणे आवश्यक असून मासिक उत्पन्न १५,००० रुपयांपेक्षा कमी असावे. तसेच ईपीएफओ/एनपीएस/ईएसआयसीचे सदस्य नसणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या वैवाहिक जोडीदारास 15 हजार रूपये पेन्शन प्रति महिना मिळणार आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन विशेष नोंदणी मोहिमेसाठी प्रभाग निहाय विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. संबंधित तारखांना सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत ही शिबिरे सुरू राहणार आहेत. लाभार्थ्यांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क साधून नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष नोंदणी मोहिमेसाठी प्रभागनिहाय वेळापत्रक
२७, २८ जानेवारी २०२६ कळंबोलीतील काळभैरव मंगल कार्यालय, २९,३० जानेवारी २०२६ कामोठे प्रभाग कार्यालय, ३,४ जानेवारी २०२६ खारघरमधील सेक्टर ७ येथील प्राईड सोसायटी,५,६ जानेवारी २०२६ नावडे प्रभाग कार्यालय,१०,११ जानेवारी पनवेल येथील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह.