तलावांच्या स्वच्छतेसाठी खारफुटी हटवण्याचा प्रस्ताव
नवी मुंबई : मुसळधार पावसात नवी मुंबईमध्ये पुरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील वेगवेगळ्या उपनगरांच्या खाडी किनारी तयार करण्यात आलेल्या धारण तलावांच्या स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाने अखेर युद्धपातळीवर आखणी सुरू केली आहे. शहरातील ११ धारण तलावांना गेल्या काही वर्षात २२७ हेक्टर इतक्या परिसरात तिवरांच्या जंगलांचा वेढा पडला असून खारफुटी तोडण्यास कायद्याने बंदी असल्याने तलावांमधील गाळ दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका प्रशासनाने २२७ हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेल्या ८० हजार खारफुटींच्या कत्तलीचा विशेष प्रस्ताव तयार केला असून वन विभाग आणि न्यायालयीन मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नवी मुंबई शहर मुंबईप्रमाणे समुद्रसपाटीपेक्षा खाली वसले आहे. मुसळधार पावसात मुंबई शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. हा अनुभव लक्षात घेऊन सिडकोतील तत्कालीन नियोजनकारांनी नवी मुंबईची उभारणी करत असताना प्रत्येत उपनगरांमध्ये खाडीच्या तोंडावर धारण तलावांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या धारण तलावांमध्ये मुसळधार पावसातही मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. भरतीच्या काळात या धारण तलावांच्या तोंडावर तयार करण्यात आलेले ‘फ्लॅप गेट’ भरतीच्या पाण्याच्या दबावाने आपोआप बंद होतात. या काळात धारण तलावांमध्ये पाणी साठवून ठेवले जाते. भरती ओसरताच दरवाजे उघडतात आणि तलावांमधील पाणी पुन्हा खाडीच्या दिशेने आपोआप निघून जाते.
धारण तलावांना खारफुटीचा वेढा
गेल्या काही वर्षांत शहरातील ११ धारण तलावांना खारफुटीचा वेढा पडला आहे. खाडीतील खारेपाणी या धारण तलावात भरती-ओहटीच्या काळात येत असते. यामुळे या धारण तलावांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर खारफुटी तयार झाली आहे. धारण तलावांच्या एकूण २२७ हेक्टरच्या क्षेत्रफळात ८० हजारांहून अधिक खारफुटी तयार झाल्याने धारण तलावांची सफाई जवळपास ठप्प झाली आहे. याचा फटका आता शहरातील काही उपनगरांना बसू लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून सानपाडा, तुर्भे, सीबीडी यासारख्या उपनगरांमध्ये सातत्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. वाढलेल्या गाळामुळे धारण तलावांची पाणी साठवण क्षमता कमी होत असल्याचा हा परिणाम असल्याचे अभियांत्रिकी विभागाचे म्हणणे आहे. गेली अनेक वर्षे धारण तलावांची सफाई झालेली नाही. खारफुटीच्या क्षेत्रात कोणतेही काम करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे या तलावांची सफाई जवळपास ठप्प झाली असून खारफुटीचे क्षेत्र वाढू लागले आहे.