संत नामदेव

देव दाखवी ऐसा नाही गुरु
देव दाखवी ऐसा नाही गुरु।
जेथे जाय तेथे दगड शेंदरू॥
देव दगडाचा बोलेल कैचा।
कोण काळी त्यास फुटेल वाचा॥
देव देव करिता शिणले माझे मन।
जेथे जाय तेथे पूजा पाषाण॥
नामा तोचि देव हृदयी पाहे।
नामा, केशवाचे न सोडी पाये॥


- डॉ. देवीदास पोटे


संत नामदेव हे विठ्ठलाचे प्रेमभंडारी म्हणजे लडिवाळ भक्त. ‘नाम’ हाच त्यांचा देव होता. आयुष्यभर ते हरिनामाच्या रंगात रंगून गेले होते. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ अशी प्रतिज्ञा करुन त्यांनी भारतभ्रमण केले आणि भागवत धर्माची धर्मपताका उत्तरेपर्यंत नेली. ‘नामे नारायण नाही भेद’ हे विचारांचे सूत्र घेऊन त्यांनी माणसाच्या जीवनाला आनंदाचे परिणाम दिले. विविध ठिकाणी विखुरलेल्या आणि मनाने विस्कटलेल्या समाजाला त्यांनी भक्तिमार्गाचे तत्त्व प्रतिपादन केले. माणसा माणसातले ऐक्य, बंधूभाव जोपासत त्यांनी राष्ट्रीय एकताही साध्य केली.


या अभंगात ते म्हणतात, ‘‘आपल्याला देव दाखवणारा गुरू मिळणार नाही. जिकडे जाऊ तिकडे शेंदूर फासलेला दगड आढळेल. या दगडाचा देव कसा काय बोलणार? त्याला कधी वाचा फुटणे शक्य आहे का? देवाचा शोध घेता घेता मन पार थकून गेले. जिकडे पाहावे तिकडे पाषाणाची पूजा चालते. मी देवाला माझ्या हृदयात पाहातो आणि केशवाच्या चरणावर मस्तक ठेवतो.’’
संत नामदेवांनी नामाच्या भक्तीने देवालाही प्रेमाचा लळा लावला. नामदेव म्हणजे भक्तीची सजीव मूर्ती.


आजच्या वर्तमान काळातही लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत. ते दगडाच्या देवावर विसंबून राहतात. उपास करतात. नवस बोलतात. लोकांना योग्य-अयोग्य समजेनासे झाले आहे. मग ते कुठल्यातरी बाबा, स्वामी, महाराज यांच्या नादी लागतात नि अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतात. देव ही दाखवण्याची वस्तू नाही. देव ज्याने त्याने प्राप्त करायचा असतो. खरा गुरू शिष्याला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. देवाचे खरे स्वरुप ओळखा असे संतांनी आपल्याला सांगितले आहे. भक्तीची वाट चालताना सगुणाकडून निर्गुणाकडे गेले पाहिजे. देवाला इकडे तिकडे न शोधता आपल्या अंतरंगातील देव शोधला पाहिजे. म्हणूनच देव हृदयी पाहे, केशवाचे न सोडी पाये असा स्पष्ट संदेश संत नामदेवांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Shravan Putrada Ekadashi 2026 : श्रावण पुत्रदा एकादशी 23 ऑगस्टला; जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

Shravan Putrada Ekadashi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘श्रावण पुत्रदा एकादशी’ किंवा ‘पवित्रा एकादशी’ असे

Babulnath Temple : मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी!

मुंबई : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (३ ऑगस्ट २०२६) संपूर्ण मुंबई शहर शिवभक्तीत चिंब भिजल्याचे

कर्म हेच ब्रह्मदेव

अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे या विषयाअंतर्गत आपण संचित प्रारब्ध ह्या संकल्पना समजावून

दशदिक्षु स्थितं दैवं, दशशक्तिसमन्वितम्

प्रभाती सूर नभी रंगती दशदिशा भूपाळी म्हणती पानोपानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदीत जागी होऊन फुले

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।।

कान्हो, ते तुझ्यासाठी केलेले दागिने काय पेटीत ठेवण्यासाठी केले आहेत? जरा अंगावर घाल, बिदरचे सरदार येणार आहेत आज

आत्मपरीक्षण

आत्मज्ञान - प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनातील सर्वांत गुंतागुंतीचा शोध कोणता, असा प्रश्न विचारला तर त्याचे