Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज बुधवार २८ जानेवारी रोजी बारामती येथे मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून अजून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाती निधनावर राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


१)  द्रौपदी मुर्मु, राष्ट्रपती



बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. अजित पवार यांचे अकाली निधन ही एक अपरिमित हानी आहे. महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी ते सदैव स्मरणात राहतील. मी त्यांचे कुटुंब, समर्थक आणि चाहत्यांप्रती शोकसंवेदना व्यक्त करते. ईश्वर या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इतर सर्व व्यक्तींच्या कुटुंबांनाही हा आघात सहन करण्याची शक्ती देवो.

२) पंतप्रधान नरेंद्र मोदी


अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.



३) अमित शहा

आज एका अत्यंत दुःखद अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे एनडीएचे ज्येष्ठ सहकारी अजित पवार यांना गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. अजित पवार यांनी गेली साडेतीन दशके ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केले, ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा त्यांची भेट व्हायची, तेव्हा ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करायचे. त्यांचे निधन ही एनडीए कुटुंबासह माझी देखील वैयक्तिक हानी आहे. मी पवार परिवाराप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. दुःखाच्या या प्रसंगी संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार परिवारासोबत खंबीरपणे उभा आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो. ॐ शांती शांती शांती”

४) राहुल गांधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आज विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायक आहे. या कठीण प्रसंगी मी महाराष्ट्राच्या जनतेच्या दुःखात सहभागी आहे. संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनांप्रती मी या शोकप्रसंगी आपल्या संवेदना व्यक्त करतो.

५) देवेंद्र फडणवीस

अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अजित पवार यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये मोठी आस्था होती. अजित पवार हे संघर्ष करणारे नेते होते. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी कठीण दिवस आहे. अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात. महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचं योगदान ते देत होते, त्याचवेळी त्यांचं निधन झालं ही बाब अविश्वसनीय आहे. माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान झालं आहे. दमदार आणि दिलदार मित्र निघून गेला आहे. पवार कुटुंबावरही हा मोठा आघात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनाही मी घडलेल्या परिस्थितीची कल्पना दिली आहे. या घटनेबाबत त्यांनीही प्रचंड दुःख व्यक्त केलं आहे. संपूर्ण घटनेमुळे राज्यात हळहळ पसरली आहे. कुटुंबाकडून पुढील गोष्टी ठरवण्यात येणार आहेत. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. महाराष्ट्रात आज शासकीय सुटी घोषित केली आहे. तसंच तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी निर्माण होते ती भरुन काढणं कठीण असतं. इतक्या जवळून, इतक्या संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. अजित पवार नाहीत या गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही अशी स्थिती आहे.

६) नारायण राणे

माझे सहकारी मित्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी मन सुन्न करून टाकणारी आहे. राजकारणाच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक संघर्ष, मतभेद आणि प्रसंग आले, पण त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन अजितदादा हे एक निर्भीड, ठाम निर्णय घेणारे आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते. सत्तेच्या केंद्रस्थानी असतानाही सामान्य माणसाच्या वेदनांशी नातं जपणारा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मागे न हटणारा असा खंबीर कणखर नेता महाराष्ट्राने आज गमावला आहे. त्यांची कार्यशैली, स्पष्ट भूमिका आणि जबाबदारीची जाणीव ही पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा, जबाबदारीला कधीच पाठ न फिरवणारा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम सज्ज असणारा असा अजितदादांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात एक खोल व वेदनादायक पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखद क्षणी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

७) एकनाथ शिंदे




आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं. अजित पवार पहाटेपासून कामाला लागायचे. सकाळी सहा वाजताही त्यांनी आदेश दिल्याचे मी स्वतः पाहिले आहेत. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच ते बोलायचे. रोखठोक स्वभाव असला, तरी मनाने ते अत्यंत निर्मळ होते. मंत्रिमंडळात जेव्हा राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा व्हायची, तेव्हा अजित पवार नेहमीच वास्तव मांडायचे आणि योग्य दिशा सुचवायचे. त्यांचा अनुभव, अभ्यास आणि प्रशासनावरील पकड आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरायची. आज त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबाचंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. मी त्यांना मनापासून आदरांजली अर्पण करतो. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक निर्भीड, धडाडीचा आणि अनुभवी नेता गमावला असून, त्यांच्या कार्याची आठवण कायम जनतेच्या मनात राहील.

८) नितेश राणे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या निधनाने जवळपास चारहून अधिक दशके महाराष्ट्राच्या समाजकारणात सेवा देणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले. प्रशासनावर असलेली त्यांची पकड, सहकार क्षेत्राची जाण, निर्णयक्षमता आणि कामातील शिस्त तसेच जनसामान्यांसाठी अखंड झटण्याची वृत्ती यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले होते. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, दाखवलेली कार्यतत्परता आणि जबाबदारीची जाणीव असंख्य कार्यकर्त्यांसाठी पथदर्शी ठरेल. त्यांचे विचार, कार्य आणि नेतृत्वाचा ठसा हा महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासावर कायमस्वरूपी कोरला गेलेला आहे. अजितदादा पवार यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो तसेच या दुःखातून सावरण्याचे त्यांच्या कुटुंबीयांना बळ मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

९) जयंत पाटील




अजितदादांकडून महाराष्ट्राच्या अजून खूप मोठ्या कार्याच्या अपेक्षा असतानाच त्यांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात कायमस्वरूपी पोकळी निर्माण करणारे आहे. राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे असेच म्हणावे लागेल. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे गेल्या जवळपास ३५ ते ४० वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते. प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम केले. महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजित दादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाही. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वाधिक उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता महाराष्ट्राने कायमचा गमावला आहे. अजित दादांची उणीव कायम भासत राहील.

१०) राज ठाकरे

माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली. १९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील. प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की. राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे. मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली.

११) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे 

दिलेला वेळ आणि शब्द पाळणारे, अशी ख्याती असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अचानक वेळेआधी आपल्याला सोडून गेले... आज दिनांक २८ जानेवारीचा दिवस या अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटनेने उजाडला ज्यामुळे आपण सर्वच शोकमग्न झालो आहोत. अजितदादा आपल्यात नाहीत हे स्वीकारायला मन अजूनही तयार नाही, इतकी ही घटना अनपेक्षित आणि खोल वेदनादायी आहे. वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, प्रशासनिक नैपुण्य, संवेदनशील नेतृत्व आणि या सर्वांचा आधार असलेले धडाडीचे विकासोन्मुख राजकारण, असे त्यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वाचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. पवार कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. माझी अजितदादा यांना आणि या दुर्दैवी विमान अपघात घटनेत प्राण गमवावे लागलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली... ओम् शांती.

१२) छगन भुजबळ 

अजितदादादांशी माझे ऋणानुबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या आधीपासून आहेत. करारी, रोखठोक स्वभाव असलेल्याअजितदादांनी विचारांशी कदापि तडजोड केली नाही. मला वाटतं हेच त्यांच्या आणि माझ्या स्वभावातील साम्य होतं. त्यांनी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात बारामतीच्या स्थानिक राजकारणापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पवार साहेबांप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेची नस ओळखणारा आणि सर्वसामान्यांशी जोडला गेलेला नेता अशी त्यांची ओळख होती. याच जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, महाराष्ट्राच्या राजकारणावर अमीट ठसा उमटविला.
स्वभावाने रोखठोक, प्रशासनावर घट्ट पकड आणि व्यक्तिमत्वात एक दरारा असलेला राजकारणी अशी प्रतिमा असूनही मनाने अतिशय स्वच्छ आणि जिंदादिल असलेल्या अजितदादांचा वावर चैतन्य निर्माण करणारा असायचा. पत्रकारांशी बोलताना प्रतिकूल असलेल्या प्रश्नांवरही मिश्किल चिमटे काढणारे दादा, अनावधानाने काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त करणारे दादा देखील या महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यांनी माझ्या ज्येष्ठत्वाचा कायम सन्मान केला. दादांनी मला आणि आमच्या भुजबळ कुटुंबाला दिलेलं प्रेम कायम स्मरणात राहील. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. अजितदादा यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना! दादा,हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही.
१३) भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाची घटना अतिशय दुःखद, धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कणखर, शिस्तबद्ध, वक्तशीर आणि कार्यतत्पर नेतृत्व गमावले आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, या शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. प्रशासनावर जबरदस्त पकड आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले धडाडीचे नेते अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला होता. यासोबतच सिंचन, ऊर्जा आणि वित्त अशा महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली अमिट छाप सोडली असेही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे. अजितदादांच्या दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो. या दुःखद प्रसंगात संपूर्ण भाजपा परिवार पवार कुटुंबीय, त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक यांच्या पाठीशी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! असेही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.




१४) नवाब मलिक


अजितदादा हे केवळ माझे नेते नव्हते, तर ते माझ्या कुटुंबाचे आधारवड होते. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि संघर्षाच्या काळात, दादा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी ढाल बनून खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी दिलेली ती साथ मी कधीही विसरू शकणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. दादांच्या निधनाने केवळ माझेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. एक कर्तव्यदक्ष आणि शब्दाला पक्का असणारा लोकनेता आपण गमावला आहे. दादा, तुमच्या आठवणी आणि तुमचे मार्गदर्शन सदैव माझ्या स्मरणात राहील असे सांगतानाच नवाब मलिक यांनी आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.


१५) प्रफुल पटेल

आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने आमचा आधारस्तंभ हरपला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे.  गेली अनेक वर्षे मी त्यांच्यासोबत काम केले. जेव्हा-जेव्हा दादांसोबत भेट होत असे, ते नेहमीच आस्थेने चौकशी करत. तब्येतीची काळजी घेण्याचा नेहमीच सल्ला देत असत. त्यांचे आणि माझे राजकारणापलीकडे कौटुंबिक संबंध होते. दादांचे निधन ही माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी आहे असेही प्रफुल पटेल यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


Comments
Add Comment

Ajit Pawar Plane Crash Video Live : विमान झुकलं, आदळलं अन् क्षणात....अजितदादांच्या विमान अपघाताचा लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज समोर

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाकेबाज नेतृत्व आज कायमचे शांत झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या

Ajit Pawar Passed Away : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ३

Ajit Pawar Passed Away : विमान फिरलं आणि ...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरकाप उडवणारी घटना

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री

Ajit Pawar Death : पहाटेचा राजा, शिस्त, वचक, ७ वेळा उपमुख्यमंत्री अन् ४० वर्षांचा दरारा...राजकारणातील धगधगतं वादळ 'अजितदादा' काळाच्या पडद्याआड!

बारामती : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील आजचा दिवस एका काळ्या अध्यायाप्रमाणे उजाडला आहे. राष्ट्रवादी

Ajit Pawar Passed Away : 'माझा मोठा भाऊ हरपला' - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीवर बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

Ajit Pawar Passed Away : पंतप्रधान मोदींसह अमित शहा यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बुधवार २८ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस