पवार कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घाला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी होऊन सत्य समोर येईल..
मुंबई : अपघात घडला तर घटनेची त्या चौकशी होतेच. या घटनेची देखील चौकशी होणार असल्याने याचे जर कोणी राजकारण करत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील याबाबत घातपात नसल्याचे स्पष्ट केले आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम करणे गरजेचे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेला घातपाताचे रंग देणाऱ्यांना चांगलेच फटकारले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अजित पवार हे खासदार, मंत्री, आमदार आणि उपमुख्यमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या भूषवलेल्या व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांच्या जाण्याने एका मोठ्या भावाचा, एक स्पष्टवक्ता आणि दिलदार नेत्याला आपण मुकलो आहोत. महाराष्ट्रावर अपार दुःख कोसळले आहे. हा केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा तोटा आहे.
मी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबियांची भेट घेतली. त्या ठिकाणी त्यांची मुले, पत्नी, सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण कुटुंब अत्यंत दुःखात होते. त्यांच्या वेदना पाहून मन हेलावून गेले. ईश्वराने या कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना आम्ही सर्वांनी केली.
शिंदे पुढे म्हणाले की, ही वेळ आरोप करण्याची नाही, राजकारण करण्याची नाही. या राज्यात एक दुर्दैवी अपघात झाला असून त्यात अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असताना या घटनेवरून राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आणि असंस्कृत आहे.
या संदर्भात शरद पवार यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की, ही कोणतीही घातपाताची घटना नाही. त्यामुळे कुणीही अफवा पसरवू नयेत किंवा या संवेदनशील घटनेला वेगळा रंग देऊ नये. पवारसाहेबांनी स्वतः पुढे येऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अजित पवार हे अत्यंत अनुभवी, स्पष्टवक्ता आणि काम करणारे नेते होते. वित्तमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या अनेक योजनांवर बारकाईने लक्ष ठेवले. विकास प्रकल्प, खर्चाचा ताळमेळ, जिल्हानिहाय योजना, तसेच ‘लाडकी बहीण’सारख्या विविध महत्त्वाच्या योजनांमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्याने सरकारलाही मोठा धक्का बसला आहे.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संपूर्ण मंत्रिमंडळ आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार यांनी मोलाची भूमिका बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत असताना, अजित पवार यांचे अनुभव आणि योगदान अत्यंत महत्त्वाचे होते.
या अपघाताबाबत शिंदे म्हणाले की, तांत्रिक बाबींची चौकशी निश्चितपणे होईल. विमान कंपन्या, संबंधित यंत्रणा, तांत्रिक तज्ज्ञ, कॅप्टन किंवा संबंधित अधिकारी यांची भूमिका तपासली जाईल. अपघात का झाला, कसा झाला, याची सखोल चौकशी होणार आहे. पण या चौकशीच्या नावाखाली राजकारण करणे किंवा कट-साजिशीचे आरोप करणे योग्य नाही.
ते म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्र सरकारक मधील अन्य मंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीला येणार आहेत. अजित पवार हे केंद्रातही मंत्री राहिले होते, त्यामुळे त्यांची लोकप्रियता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारो, लाखो लोक विविध जिल्ह्यांतून येत आहेत. ही परिस्थिती पाहता संपूर्ण महाराष्ट्र या दु:खात सहभागी झालेला दिसतो.
शिंदे पुढे म्हणाले की, या अपघातात सहा जणांचे दुर्दैवी निधन झाले आहे. या सर्वांच्या कुटुंबियांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय पातळीवर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
शेवटी ते म्हणाले की, ही अत्यंत संवेदनशील आणि दुःखद घटना आहे. अशा वेळी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे या घटनेवरून राजकारण न करता, एकजुटीने पवार कुटुंबियांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.