मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच, या भीषण विमान अपघातामागील प्राथमिक कारण स्पष्ट झाले आहे. बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी असलेली कमी दृश्यमानता (लो व्हिजिबिलिटी) हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी बुधवारी स्पष्ट केले.
मंत्री नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अजित पवार यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळाच्या हद्दीत दाखल झाले असता परिसरात दाट धुके होते. या वेळी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (एटीसी) वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसत आहे का, अशी विचारणा केली होती. त्यावर वैमानिकाने धावपट्टी दिसत नसल्याचे कळवले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विमानाने हवेतच एक फेरा (गो-अराउंड) मारला.
यानंतर दुसऱ्या प्रयत्नात वैमानिकाने धावपट्टी दिसत असल्याची माहिती दिल्यानंतर एटीसीने लँडिंगची परवानगी दिली. मात्र, प्रत्यक्ष लँडिंगच्या वेळी दृश्यमानता केवळ सुमारे ८०० मीटर इतकी मर्यादित असल्याने वैमानिकाचा अंदाज चुकला असावा. परिणामी, विमान धावपट्टीच्या जवळील शेतात कोसळले आणि त्यानंतर भीषण स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) यांची पथके घटनास्थळी दाखल झाली असून, संपूर्ण प्रकरणाची अत्यंत पारदर्शक पद्धतीने चौकशी केली जाईल, असे आश्वासन मंत्री नायडू यांनी दिले आहे. दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री के. राममोहन नायडू यांनी बारामती येथे जाऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.