मुंबई पालिकेतील महत्त्वाच्या समित्यांची गणिते जुळवून गट नोंदणी करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; शिवसेनेची नोंदणी थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला नाही


मुंबई : मुंबई महापालिकेतील स्थायी समितीसह विविध महत्त्वाच्या समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी गट नोंदणी करताना संख्याबळाच्या टक्केवारीचे गणित लक्षात घेतले जाईल. त्यानंतरच भाजप आणि शिवसेनेची एकत्र नोंदणी करायची, की स्वतंत्र, याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केली.


राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना वगळता अन्य सर्व पक्षांनी त्यांच्या नगरसेवक गटांची नोंदणी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्याने भाजपची गट नोंदणी रखडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मुख्यमंत्री परतल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेची गट नोंदणी अद्याप झालेली नाही.


दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेवकांची गट नोंदणी मंगळवारी (२७ जानेवारी) होणार होती. मात्र, अचानक घडलेल्या घडामोडींमुळे ही नोंदणी पुढे ढकलण्यात आली. यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी गट नोंदणीमागील गणित स्पष्ट केले. ते म्हणाले, “गट स्थापन करताना केवळ संख्या नव्हे, तर टक्केवारीचा विचार करावा लागतो. कधी एकत्रित गट नोंदणी केल्यास फायदा होतो, तर कधी वेगवेगळे गट स्थापन केल्याने अधिक लाभ मिळतो. काही वेळा एखादा छोटा गट दुसऱ्या गटासोबत जोडल्यासही फायदा होतो. महापौर आणि उपमहापौरपद वगळता उर्वरित पदांचे वाटप हे एकूण संख्येच्या टक्केवारीवर ठरते. त्यामुळे सर्व पर्यायांचा अंदाज घेऊनच निर्णय घेतला जातो”, असे त्यांनी सांगितले.

चर्चेतून निर्णय घेणार


भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेची गट नोंदणी थांबवण्यात आल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हस्तक्षेप असा काही प्रकार नसतो. आम्ही एकत्र काम करणारे असून चर्चेतूनच निर्णय घेतले जातात. शिवसेनेची नोंदणी ठरल्याप्रमाणे होईल आणि त्यानुसार भाजपचीही गट नोंदणी केली जाईल. गट नोंदणीत केवळ टक्केवारीचे राजकीय गणित महत्त्वाचे असून स्थायी समितीत जास्तीतजास्त सदस्य कसे मिळतील, यासाठी योग्य संयोजन केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत डॉ. भूषण गगराणी राहणार पिठासीन अधिकारी

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी यापूर्वी पिठासीन अधिकारी म्हणून

वांद्र्यात वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी पादचाऱ्यांना स्कायवॉकचा पर्याय

मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वेड्या वाकड्या उभ्या केलेल्या रिक्षा, कचऱ्याचे साम्राज्य तसेच

राज्यातील आयटीआयमध्ये पीएम–सेतू योजना राबविणार

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला मंगळवारी

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी

मराठी न शिकविणाऱ्या शाळांची होणार तपासणी

अहवाल सादर करण्याचे शिक्षण आयुक्तांना निर्देश मुंबई : महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल : महाराष्ट्रात देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू

मुंबई: महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये माननीय