विविध भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार
ठाणे : ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील भातसा नदीवरील बंधाऱ्यावर बसवण्यात आलेल्या न्युटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार असल्याने नदीतील पाण्याची पातळी कमी करण्यात आली आहे. परिणामी पिसे येथील उदंचन केंद्रातील पाण्याची पातळी घटली असून, ठाणे महापालिकेला मिळणारा पाणीपुरवठा सुमारे २० टक्क्यांनी कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठामपाने शहरात पुढील १२ दिवस टप्प्याटप्प्याने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला असून, विविध विभागांमध्ये २४ तासांचे पाणी शटडाऊन घेण्यात येणार आहे. काही भागांत कमी दाबाने तर काही भागांत पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
२८ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत रोज वेगवेगळ्या प्रभागांमध्ये सकाळी ९ ते पुढील दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. वागळे, वर्तकनगर, कळवा, मुंब्रा, कोपरी, राबोडी, माजीवाडा, मानपाडा, ढोकाळी, कासारवडवली आदी प्रमुख भागांचा समावेश आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.






