गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकर
‘चांगले तेवढे घ्यावे’ ही म्हण आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजूबाजूच्या जगात आपण अनेक लोक, घटना, विचार, अनुभव आणि परिस्थिती पाहतो. त्यापैकी सर्वच गोष्टी आपल्यासाठी योग्य किंवा उपयुक्त असतीलच असे नाही. म्हणूनच जे चांगले, योग्य आणि उपकारक आहे तेवढेच स्वीकारण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काही चांगले गुण असतात तशाच काही उणिवाही असतात. आपण इतरांच्या उणिवांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांकडून प्रेरणा घ्यावी. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती शिस्तप्रिय असेल तर तिच्याकडून शिस्त शिकावी, तर एखादी व्यक्ती कष्टाळू असेल तर तिच्याकडून मेहनतीची सवय आत्मसात करावी. जीवनातील अनुभवही आपल्याला बरेच काही शिकवतात. काही अनुभव आनंददायी असतात तर काही कटू. आनंददायी अनुभव आपल्याला सकारात्मकता देतात, तर कटू अनुभव आपल्याला सावध राहायला, चुका टाळायला शिकवतात. दोन्ही अनुभवांतून जे चांगले शिकता येईल ते घ्यावे आणि नकारात्मक गोष्टी मागे टाकाव्यात. आजच्या डिजिटल युगात माहितीचा महापूर आहे. सोशल मीडिया, टीव्ही, इंटरनेट यांवर अनेक चांगल्या-वाईट गोष्टी दिसतात. अशावेळी योग्य-अयोग्य याची ओळख करून घेऊन सकारात्मक, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी गोष्टींचाच स्वीकार करणे फार गरजेचे आहे. ‘चांगले तेवढे घ्यावे’ या विचारामुळे आपले व्यक्तिमत्त्व अधिक सुसंस्कृत, सकारात्मक आणि संतुलित बनते. त्यामुळे जीवनात यश, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. म्हणूनच नेहमी विवेकबुद्धी वापरून चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि उर्वरित गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. बिहारमधील एका शहरातील ही कथा. त्या शहरातील एका छोट्याशा वाडीत सूरजकुमार नावाचा एक सद्गुणी तरुण राहात होता. जगातील सर्व आदर्शवत गुण त्याच्या ठायी होते. सूरजकुमारचे पालक तसे अशिक्षित व परिस्थितीने सामान्य होते. आजूबाजूचे वातावरण काही तेवढे आदर्श नव्हते; असे असताना सूरजकुमारच्या या वागण्याचे सर्वांना आश्चर्य वाटायचे.
एकदा एका गृहस्थाने सूरजकुमारला विचारले, “बाबा रे, तुला एवढ्या चांगल्या रीतीभाती कोणी शिकवल्या? इतके सद्गुण तू कोणापासून घेतलेस?” त्या गृहस्थाचा हा प्रश्न ऐकून. तो तरुण नम्रपणे म्हणाला, “आपण म्हणता तेवढा मी काही गुणवान नाही. पण आज माझ्या ठिकाणी काही चांगले गुण आहेत, ज्या चांगल्या गोष्टी दिसून येतात, त्याचे श्रेय आजूबाजूच्या एका असंस्कृत, दुर्गुणी माणसाला आहे.” सूरजकुमारच्या या उत्तराने त्या गृहस्थाला खूपच आश्चर्य वाटले. तो गृहस्थ सूरजकुमारला म्हणाला, “असंस्कृत व दुर्गुणी माणसाकडून तू सद्गुण कसे काय घेतलेस?” त्यावर सूरजकुमार त्याला म्हणाला, “माझ्या समोर राहणाऱ्या त्या असंस्कृत व दुर्गुणी माणसावर आजूबाजचे लोक टीका करीत. त्यामुळे वाईट काय व चांगले काय याविषयी मला विचार करणे शिकायला मिळाले. वाईट गोष्टींपासून मी अलिप्त राहिलो आणि सद्गुणांचा मी स्वीकार केला. ते सद्गुण मी आत्मसात केले. त्यामुळे आज माझ्या अंगी चांगले गुण आढळतात. या सर्वांचे श्रेय मी त्या माझ्या समोरच्या असंस्कृत माणसालाच देतो.”
● तात्पर्य : समाजामध्ये चांगल्या व वाईट दोन्ही प्रवृत्तीचे लोक असतात. आपण त्यांच्याकडून सद्गुण घ्यावेत की दुर्गुण घ्यावेत हे प्रत्येक व्यक्तीने ठरवायचे असते. विचार : माणूस वाईट नसतो, तर त्याच्यातील वृत्ती वाईट असतात; म्हणून माणसाचा तिरस्कार न करता वाईट वृत्तीचा तिरस्कार करा.






