सखोल चौकशीची मागणी
कल्याण : उबाठाचे कल्याण पूर्वेतील नवनिर्वाचित चार नगरसेवक अद्यापही ‘नॉट रिचेबल’ असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर उबाठाने पोलीस ठाण्यात हरवल्याची अधिकृत तक्रार दाखल केली आहे. उबाठाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी या प्रकरणी थेट पोलीस ठाण्यात अर्ज देत, संबंधित नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपास करण्याची मागणी केली आहे.
नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे का, की अपहरणाचा प्रकार घडला आहे, याबाबत सखोल चौकशीची विनंती केली आहे. “जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या,” असे आवाहन करत वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतरच तक्रार करण्यात आली असे स्पष्टीकरण शरद पाटील यांनी दिले आहे.
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संशय: कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच राज ठाकरे यांच्या मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीसाठी आलेल्या नगरसेवकांच्या भेटीदरम्यान मनसेचे माजी आ. राजू पाटील, खा. श्रीकांत शिंदे आणि आ. नरेश म्हस्के यांच्यात चर्चा होऊन मनसेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे भाजप आणि उबाठाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू होती. अशा स्थितीत उबाठाचे चार नगरसेवक अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने ते कोणाच्या दबावाखाली आहेत का? किंवा अन्य कुठल्या राजकीय डावपेचाचा भाग आहेत का? अशी शंका उपस्थित होत आहे.
कडोंमपा निवडणूक निकाल २०२६:
एकूण जागा: १२२
शिवसेना (शिंदे गट): ५३
भाजप: ५०
शिवसेना (उबाठा): ११
मनसे: ५
काँग्रेस: २
राष्ट्रवादी (शरद पवार गट): १






