Sunday, January 25, 2026

संधिप्रकाश कसा पडतो?

संधिप्रकाश कसा पडतो?

सीता व नीता या दोघी जुळ्या बहिणी खूपच हुशार होत्या. त्यांच्याकडे सुट्टी असल्याने शहरातील त्याची प्राध्यापिका मावशी आलेली होती. मग या दोघीजणी त्या मावशीला रोज सायंकाळी आपली शाळा सुटल्यावर घरी आल्यानंतर वेगवेगळे प्रश्न विचारीत असायच्या. त्या दिवशीसुद्धा त्या शाळा सुटल्यावर घरी आल्या. आधी आपला गृहपाठ करून घेतला. गृहपाठ संपल्यावर त्या मावशीसोबत सतरंजी घेऊन गच्चीवर गेल्या. सतरंजी अंथरून त्यावर त्या तिघीहीजणी बसल्या. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्या गप्पा करीत निसर्गाचे नयनमनोहर सौंदर्य बघत असतांनाच संधिप्रकाशसुद्धा आपला गाशा गुंडाळू लागला. तेव्हा मावशीनेच विचारले, “का गं मुलींनो! आपण आता या गच्चीवर उभे आहोत. आता सूर्यास्त झाल्यानंतरही आपणास येथे हा अंधुकसा प्रकाश दिसत आहे. याला काय म्हणतात गं?” असे विचारीत मावशी सतरंजीवर खाली बसली. “संधिप्रकाश” दोघींनीही एकासुरात उत्तर दिले. “पण मावशी त्याला संधिप्रकाशच का म्हणतात?” नीताने प्रश्न केला. “संधिकाळ म्हणजे कोणता काळ? ही तुम्हाला कल्पना आहे का?” मावशीने दोघींनाही प्रतिप्रश्न केला. “नाही मावशी.” म्हणत दोघींनीही नकारात्मक मान हलवली. “ज्या काळाला दिवसही म्हणता येत नाही व रात्रही म्हणता येत नाही त्या काळाला संधिकाळ असे म्हणतात. सकाळी रात्र संपून दिवस सुरू होतो व सायंकाळी दिवस संपून रात्र सुरू होते तो काळ म्हणजे संधिकाळ असतो. त्या संधिकाळात हा प्रकाश दिसतो म्हणून त्याला संधिप्रकाश असे म्हणतात. सूर्य मावळल्यानंतरही हा प्रकाश कसा येतो हे माहीत आहे का तुम्हाला?” मावशीने माहिती सांगत विचारले. “नाही मावशी! तूच सांग ना आम्हाला,” दोघीही म्हणाल्या. “त्याचं असं आहे!” मावशी सांगू लागली, “संध्याकाळी सूर्य क्षितिजाखाली जाताना वातावरणातील धूलिकण, जलबिंदू, हवेचे रेणू व इतर अन्य पदार्थांच्या कणांमुळे सूर्यप्रकाशाचे परावर्तन, विवर्तन व विकिरण होते. त्यामुळे सूर्यप्रकाश चौफेर विखुरला जातो.” “मावशी परावर्तनाबद्दल आम्ही शिकलो आहोत. विकिरण हे तुम्ही आताच थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगितले पण विवर्तन म्हणजे काय?” सीताने विचारले. “हे विवर्तन आता मध्येच काय आणले गं तू मावशी?” नीतानेसुद्धा शंका काढलीच. “सूर्यप्रकाश हा सरळ रेषेतच जातो हे माहीत आहे ना तुम्हाला?” मावशीने विचारले. “होय मावशी.” दोघीही म्हणाल्या. “प्रकाशाच्या मार्गामध्ये एखादा अपारदर्शक पदार्थ धरला तर काय होईल?” मावशीने विचारले. “त्याची सावली पडते.” दोघींनीही उत्तर दिले. “बरोबर आहे.” मावशी म्हणाली, “अशा मोठ्या आकाराच्या अपारी म्हणजे आपरदर्शक पदार्थाच्या कडेवरून जातांना प्रकाश किरणांची दिशा बदलून ते सावलीमध्ये पसरतात. या प्रक्रियेस विवर्तन असे म्हणतात. सूर्य क्षितिजाआड असताना पृथ्वीवरील पर्वतांच्या कडांवर पडलेल्या सूर्यप्रकाशकिरणांचे विवर्तन होते. विवर्तनामुळे प्रकाशकिरण आपली दिशा बदलून डोंगरकडांवरून पुढे खाली वाकतात व पर्वताच्या सावलीत पोहोचतात. समजले का?” मावशीने विचारले. “होय मावशी!” दोघीही म्हणाल्या, “पुढे सांगा.” मावशीने सांगण्यास सुरुवात केली, “अशा या वातावरणातील विवर्तित प्रकाशाच्या विकिरणामुळे विखुरलेला प्रकाश आपणापर्यंत येऊन पोहोचतो. तसेच काही प्रकाश वातावरणात थेट वर जात असतो. वातावरणातून त्याचे परावर्तन होऊन तोही प्रकाश खाली पोहोचतो. अशा प्रकाशालाच आपण ‘संधिप्रकाश’ म्हणतो. शहरापासून दूर मोकळ्या भूमीवर संधिप्रकाश खूप चांगला दिसतो. संध्याकाळी सूर्य जसजसा अधिकाधिक खोल खोल म्हणजे जसजसा दूर दूर जातो तसतसे उंच आकाशात गेलेले त्याचे हे किरण कमी कमी होत जाऊन संधिप्रकाश हळूहळू कमी कमी होत जातो. हळूहळू काळोख सुरू होतो व शेवटी पूर्णपणे अंधार पडतो व रात्र सुरू होते.” मग त्यादिवशी थोडा उशीर झाल्याने व अंधार पडल्याने त्या सा­ऱ्याजणी गच्चीवरून खाली आल्या.

Comments
Add Comment