नेत्यांच्या पुढील निर्णयावर वसई-विरारमधील काँग्रेसचे भवितव्य
गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची काँग्रेससोबत 'हात' मिळवणी झाली किंवा नाही. याबाबतचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही प्रकारे दिल्या जाऊ शकते. काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार दहा ठिकाणी एकमेकांविरोधात उभे होते. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांची आघाडी झाली नाही. असे म्हणता येईल, तर दुसरीकडे पंजा या निशाणी वरील एका उमेदवाराला सोबत घेऊन बहुजन विकास आघाडीने निवडणूक लढविली, आणि निवडूनही आणले. याहीपुढे जाऊन, काँग्रेस नेते विजय पाटील यांची मुलगी आणि सून यांना देखील बहुजन विकास आघाडीने उमेदवारी दिली. त्या ननंद भावजय दोघी बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर निवडून सुद्धा आल्या आहेत. त्यामुळे एकीकडे काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात उमेदवार देणे आणि दुसरीकडे काँग्रेसच्याच उमेदवारांना निवडून आणण्याचे काम बहुजन विकास आघाडीने केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा जय पराजय दोन्ही पाहायला मिळाला आहे. अशा प्रकारे काँग्रेससाठी वेगळ्याच झालेल्या या निवडणुकीत पक्ष म्हणून काँग्रेसचा 'विजय' झाला की, 'गेम' असा प्रश्न काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
एकेकाळी दिवंगत भाऊसाहेब वर्तक यांच्या काळात काँग्रेसचा गड असलेल्या वसई-विरारमध्ये महापालिकेची निवडून काँगेस आता स्वबळावर लढणार की, माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी सोबत घरोबा करून लढणार याबाबत अधिकृत निर्णय मतदानाच्या दिवसा पर्यंत होऊ शकत नाही. हे काँगेसच्या स्थानिक नेत्यांसोबतच प्रदेश स्तरावरील नेत्यांचे देखील अपयश आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पंजा तिकिटावर निवडणूक लढलेले विजय पाटील यांनी त्यांची मुलगी आणि सून या दोघींना बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी मिळवून दिली. व्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे,म्हणून या दोघी बहुजन विकास आघाडीसोबत होत्या असे चित्र येथे नव्हते. तर विजय पाटील हे आजही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गणल्या जात असताना त्यांनी स्वतः हा यशस्वी प्रयोग केल्याने याबाबत चर्चा होणे स्वाभाविक आहे. तसेच काँग्रेसच्याच स्यारल डाबरे यांना बहुजन विकास आघाडीने आपल्या पॅनलसोबत घेऊन सुद्धा पंजा या निशाणीवर निवडणूक लढायची मुभा दिली.
बीना फूर्ट्यांडो या सुद्धा काँग्रेस पदाधिकारी असताना बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढल्या आणि निवडून आल्या तर दुसरीकडे काँग्रेसचे रामदास वाघमारे, कुलदीप वर्तक यांच्या पत्नी अंकिता वर्तक, अशरफ अली, तबारक खान, मीरा तांबे,ओनिल अल्मेंड़ा, रॉयस परे, वेलेंटाइन मिर्ची आणि निखिलेश उपाध्याय या काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार लढले. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांसाठीच सलीम खीमानी, नीलेश पेंढारी, प्रवीणा चौधरी, डॉमनिक डिमेलो, नागेश भोईर, राकेश घोंसलवीस आणि संदीप कन्नौजिया अशा काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी असलेल्या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
एकंदरीतच अशा वेगळ्याच परिस्थितीतून काँग्रेस या निवडणुकीमध्ये गेली आहे. काँग्रेसचे काही पदाधिकारी बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर निवडून आले असले तरी, काँग्रेसला पंजा या निशाणीवरील दाव्याने सांगायला केवळ एक आणि एकच नगरसेवक वसई-विरारमध्ये आहे. त्यामुळे वसई विरार मधील काँग्रेसला उभारी देण्यासाठी या निवडणुकीचा धडा घेत प्रदेश स्तरावरील नेत्यांनी यापुढे संघटनासह आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा महापालिकेच्या निवडणुकीसारखी तळ्यात मळ्यात राहिलेली काँग्रेसची अवस्था, याहीपेक्षा बिकट राहील अशी भीती काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.






