शिवसेनेऐवजी भाजपबरोबर गेले असते तर... राजकीय चर्चांना वेग
कल्याण/ डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने पहिला महापौर करण्याची सुवर्णसंधी गमावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेसोबत युती करण्याची घाई मनसेला महागात पडल्याचे बोलले जात आहे. महापौर आरक्षण सोडतीनंतर महापौरपद अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव झाले.
आरक्षणापूर्वीच मनसेने भाजप-शिवसेनेच्या रस्सीखेचीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत स्वतंत्र गट स्थापन केला. गट स्थापनेपूर्वीच मनसेने महापौरपदाचा ठोस शब्द घेतला असता आज मनसेचा पहिला महापौर होण्याची संधी प्रत्यक्षात येऊ शकली असती, अशी चर्चा आहे. एसटी प्रवर्गातून केवळ तीन नगरसेवक विजयी झाले त्यापैकी दोन शिवसेनेकडून तर एक मनसेकडून निवडून आला आहे. मनसेच्या शीतल मंढारी या एसटी आरक्षित जागेवरून विजयी झाल्याने मनसेकडे महापौरपदाची संधी निर्माण झाली असती. किरण भांगले हे शिवसेना दे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक असून त्यांनी प्रथमच निवडणूक लढवली आहे. तर हर्षाली थवील या अनुभवी नगरसेविका असून पालिकेच्या कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. महिला महापौर म्हणून त्यांना संधी दिली जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
कल्याणला महापौरपदाची शक्यता : मागील टर्ममध्ये डोंबिवलीला महापौरपदाची संधी मिळाली. यंदा पुन्हा तीच संधी मिळणार का अशी चर्चा होती. डोंबिवलीतून एकही एसटी प्रवर्गातील नगरसेवक नसल्याने महापौरपदाची संधी कल्याणकडे झुकली. दोन महिला आणि एक पुरुष नगरसेवक असल्याने उत्सुकता शिगेला आहे.






