मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारतातील विशाल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) परवडणारे आणि वेळेवर कर्ज उपलब्ध होण्याच्या प्रवाहामध्ये लक्षणीय वाढ करण्याच्या उद्देशाने, सिडबीमध्ये तीन टप्प्यांत ५००० कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे असे सिडबी (SIDBI) या वित्तीय संस्थेने जाहीर केले आहे. सिडबीत आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ३००० कोटी रुपये, आणि आर्थिक वर्ष २७ आणि २८ मध्ये प्रत्येकी १००० कोटी रुपये या टप्याटप्याने ही गुंतवणूक करण्यात येईल असे सरकारने यावेळी स्पष्ट करण्यात आले. सिडबीच्या कामकाजात विस्तारासाठी सरकारने हा भांडवली गुंतवणूकीचा धोरणात्मक निर्णय घेतला. अलीकडच्या वर्षांत सिडबीने आपल्या कामकाजाचा वेगाने विस्तार केला आहे आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी तिची ताळेबंद ५.८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला होता. वाढलेल्या विस्तारावर बोलताना,गेल्या दोन आर्थिक वर्षांत ६५ शाखा उघडल्या आहेत आणि तिचे सध्याचे शाखा जाळे १६१ शाखांचे आहे, जे भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (MoMSME) ओळखलेल्या १९५ प्रमुख MSME क्लस्टर्सना सेवा देते' असे सिडबीने म्हटले.
या भांडवली गुंतवणुकीमुळे देशभरातील लघू सूक्ष्म व मध्यम उद्योग (MSME) उद्योगांना सेवा देण्याची सिडबीची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल आणि सर्व प्रमुख MSME क्लस्टर्सपर्यंत पोहोचणे शक्य होईल असे सिडबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. बँक या भांडवली पाठबळाचा उपयोग करून आपल्या शाखांचे जाळे विस्तारून, खेळत्या भांडवलासाठी अधिक नाविन्यपूर्ण डिजिटल उत्पादने, इनव्हॉइस डिस्काउंटिंग, संरक्षण क्षेत्रासाठी विशेष उत्पादने, यंत्रसामग्री कर्ज इत्यादी सुरू करून आपला व्यवसाय आणखी वाढवेल. सिडबी परिसंस्था विकासासाठीचे आपले प्रयत्नही वाढवेल. याव्यतिरिक्त, थीम-आधारित पुनर्वित्त सहाय्य, विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) आणि आर आर बी (RRB) सोबत सह- कर्जपुरवठा, इन्क्यूबेशन आणि प्री- आयपीओ टप्प्यावर इक्विटी सहाय्य तसेच अँकर गुंतवणूक देखील वाढवली जाईल असेही सिडबीने म्हटले.
याविषयी बोलताना,सिडबीचे सीएमडी मनोज मित्तल म्हणाले आहेत की,'सिडबीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी भारत सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो. मला खात्री आहे की, 'विकसित भारत, २०४७'अंतर्गत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशाचे विकासाचे इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MSME क्षेत्राला सक्षम बनवण्यात सिडबी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.'बँक अनौपचारिक सूक्ष्म उद्योगांच्या (IMEs) औपचारिकतेची प्रक्रिया देखील वाढवेल आणि ऊर्जा-कार्यक्षम व क्लस्टर हस्तक्षेपांच्या माध्यमातून परिसंस्था विकासाला पाठिंबा देईल, ज्यामध्ये वित्तपुरवठा तसेच उद्योग संघटनांसोबत पोहोच कार्यक्रम यांचा समावेश असेल असेही संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले.
१९९० मध्ये स्थापनेपासून, सिडबीने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSMEs) सर्वांगीण विकासासाठी आपल्या एकात्मिक, नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातून समाजाच्या विविध स्तरांतील नागरिकांना वित्तीय पुरवठा केला आहे. सिडबीने विविध पतपुरवठा आणि विकासात्मक उपायांद्वारे देशातील असंख्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकला आहे. पारंपरिक, स्थानिक छोटे उद्योजक अथवा समाजाच्या तळागाळातील उद्योजक असोत किंवा उच्चस्तरीय ज्ञानावर आधारित उद्योजक असोत सिडबीचा देशव्यापी पातळीवर नेहमी प्रभाव राहिला होता.






