Friday, January 23, 2026

‘एमआयएम’च्या नगरसेविका सहर शेखला पोलिसांची नोटीस

‘एमआयएम’च्या नगरसेविका सहर शेखला पोलिसांची नोटीस

मुंब्रा  :महापालिका निवडणुकीत मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या तिकिटावर विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. विजयानंतर केलेल्या आक्रमक भाषणामुळे मुंब्रा पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना नोटीस बजावली आहे. विजयानंतरच्या सभेत सहर शेख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता ‘कैसा हराया?’ असा टोला लगावत, पुढील पाच वर्षांत “संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवू,” असे विधान केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या विधानाची गंभीर दखल घेत मुंब्रा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावली असून, समाजात असंतोष निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळण्याची कडक तंबी दिली आहे. दरम्यान, वाद वाढल्यानंतर सहर शेख यांनी स्पष्टीकरण देत, “माझं वक्तव्य सटायर स्वरूपाचं होतं. त्याला सांप्रदायिक अर्थ काढू नये. मी पूर्णपणे सेक्युलर विचारांची आहे,” असा दावा केला आहे. आव्हाडांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंब्र्यात एमआयएमने मिळवलेला हा विजय राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात असून, त्यानंतर निर्माण झालेल्या या वादामुळे परिसरातील राजकारण अधिक तापले आहे.

Comments
Add Comment