अहमदाबाद : गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. परवानाधारक शस्त्र हाताळताना झालेल्या दुर्घटनेत तरुण पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यानंतर पतीने स्वतः जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मृत पती हे ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यसभा खासदार शक्तीसिंह गोहिल यांचे पुतणे असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्लास वन अधिकारी असलेले यशराज सिंह गोहिल आणि त्यांची पत्नी राजेश्वरी हे बुधवारी रात्री एका कार्यक्रमातून घरी परतले होते. दोघांचे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. घरात आल्यानंतर बेडरूममध्ये असताना यशराज आपली परवानाधारक रिव्हॉल्वर चेक करत असताना यांच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी सुटली. ही गोळी राजेश्वरी यांच्या मानेला लागली आणि त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेनंतर घाबरलेल्या यशराज यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून मदतीची मागणी केली. मात्र, वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत राजेश्वरी यांचा मृत्यू झाला होता. आपल्या निष्काळजीपणामुळे आपली पत्नी आपल्याला कायमची सोडून गेली, या विचाराने यशराज कोलमडले.
काही वेळातच घरातील बेडरूममधून पुन्हा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. कुटुंबीय आणि रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी आत धाव घेतली असता, यशराज हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यांनी त्याच शस्त्राचा वापर करून स्वतःवर गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांनी अपघाती मृत्यू आणि आत्महत्येचा गुन्हा नोंदवला आहे.






