उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह
मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि मनसे यांच्यात झालेली युती ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवानगीनेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या युतीची माहिती राज ठाकरेंना नव्हती आणि त्यामुळे ते व्यथित होते, असा उबाठा गटाचा दावा फोल ठरला असून, ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपने युती करून निवडणूक लढवली होती. या युतीला बहुमत मिळाले. तर मनसेने उबाठा गटासोबत निवडणूक लढवली होती, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र निवडणूक निकालानंतर अवघ्या आठवडाभरात मनसेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर, या युतीची कल्पना राज ठाकरे यांना नव्हती आणि त्यामुळे ते नाराज असल्याचा दावा उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र, हा दावा तथ्यहीन असल्याचे आता समोर आले आहे.