Thursday, January 22, 2026

सत्तेसाठी नाही, विकासासाठी मनसेचा कौल!

सत्तेसाठी नाही,  विकासासाठी मनसेचा कौल!

मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

डोंबिवली : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे सेनेत रस्सीखेच सुरु असताना बुधवारी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना दिसल्या. कल्याण-डोंबिवलीत एकीकडे भाजप ५०, शिंदेसेना ५३ जागा विजयी झाली होती. काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत आकडेमोड, पळवापळवी हा खेळ सुरू होता. भविष्यात समित्यांच्या निवडणुका असतात त्यावेळीही गोंधळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे कुठेतरी स्थिरता यावी या हेतूने आम्ही शिंदेसेनेला पाठिंबा दिला आहे. शिंदेसेना-भाजप एकत्र लढलेत. जनतेच्या हितासाठी आम्ही त्यांना समर्थन देत आहोत अशी भूमिका मनसे नेते राजू पाटील यांनी मांडली.

कोकण भवनात नगरसेवकांची गट नोंदणी केल्यानंतर राजू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आम्हाला काय भेटण्याऐवजी सत्तेत असल्याने विकासाची कामे होतील यासाठी आम्ही पाठिंबा दिला. आम्ही उबाठाच्या पक्षासोबत युतीत लढलो होतो. निकालानंतर काही नगरसेवक गायब झाले. त्यामुळे आम्हाला आमच्या नगरसेवकांचीही चिंता होती आणि त्यांच्याही नगरसेवकांची चिंता होती. कल्याण-डोंबिवलीतील जनता पळवापळवीच्या राजकारणाला कंटाळली होती हे कुठेतरी थांबावे म्हणून आम्ही पाठिंबा दिला. कुठल्याही स्वार्थासाठी घेतलेला हा निर्णय नाही. आम्ही ठामपणे सामोरे आलो आहोत. जेव्हा आमचे निकाल समोर आले आणि आम्ही इथले गणित राज ठाकरेंना सांगितले तेव्हा स्थानिक पातळीवर जो तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तो घ्या असे साहेबांनी सांगितले. त्यानुसार आम्ही निर्णय घेतला आहे असे पाटील यांनी सांगितले.

त्याशिवाय भाजप-शिंदेसेना एकत्र आहेत मग भाजपला बाजूला ठेवायचा प्रश्न नाही. मला कल्याण-डोंबिवलीतील जनतेलाही प्रश्न विचारायचा आहे. ५ नगरसेवकांमध्ये आम्ही सत्तेच्या बाहेर राहून जनतेला न्याय देऊ शकलो असतो का? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही अंकुश ठेवू शकतो.

भलेही आम्ही त्यांची सत्ता पाडू शकत नाही मात्र आमचे जे मुद्दे आहेत, किमान समान कार्यक्रम घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी टीका टीप्पणी अनेकांनी केली आहे. काही ठिकाणी मनसे-उबाठासेनेचे उमेदवार आमनेसामने लढले; परंतु आता ही वेळ नाही. स्थानिक पातळीवर हे विषय होतात. दोन्ही पक्ष नेतृत्वाचा त्यात दोष नव्हता. आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन पुढे चाललोय. कल्याण-डोंबिवलीत एक स्थिरता आणायची होती. त्यामुळे आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे असे राजू पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत असे राज ठाकरेंनी सांगितले होते. स्थानिक राजकारण जे सुरू होते त्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या नेत्यांनी घेतला आहे. ८ ठिकाणी उबाठासेनेचेही उमेदवार आमच्याविरोधात होते. एकदा निवडणूक संपल्यानंतर आमचे निवडून आलेले नगरसेवक त्यांना जे वाटते त्यानुसार निर्णय घेण्याची मुभा पक्षाने पाटील यांना दिली होती. त्यानुसार स्थानिक जनतेच्या हिताला प्राधान्य देत राजू पाटील यांनी निर्णय घेतला आहे अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

Comments
Add Comment