Thursday, January 22, 2026

अलिबागचा हापूस मुंबईच्या बाजारात

अलिबागचा हापूस मुंबईच्या बाजारात

वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये पहिली पेटी दाखल

नवी मुंबई : कोकणच्या मातीतून आलेला आणि चवीसाठी ओळखला जाणारा अलिबागचा हापूस अखेर मुंबईच्या बाजारात आला आहे. अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील आंबा उत्पादक गौरव पाटील यांच्या बागेतील हापूसच्या दोन पेट्या नवी मुंबई एपीएमसीत दाखल झाल्या.

अलिबाग तालुक्यातील आंब्याला मोठी मागणी असते. भातशेतीसोबत आंबा लागवडीकडे अलिबागच्या शेतकऱ्यांचा कल वाढत असून तरुण शेतकरी आधुनिक पद्धतीने आंबा शेतीकडे वळत आहेत. यंदा पावसाने ऑक्टोबर अखेरपर्यंत हजेरी लावल्याने आंबा पिकासमोर अनेक अडचणी होत्या. मात्र कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी फवारणी व आंब्याचे झाड सुरक्षित राहिले. कठीण हवामानातही गौरव पाटील यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजेच यंदाच्या हंगामातील पहिली आंब्याची पेटी बाजारात दाखल झाली.

यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने मोठे आव्हान होते. तरीही योग्य देखभाल आणि मेहनतीमुळे आंबा लवकर तयार झाला. या हंगामातील पहिली हापूसची पेटी वाशी एपीएमसीला पाठवता आली, याचा आनंद आहे, असे गौरव पाटील आंबा उत्पादक यांनी सांगितले. अलिबागच्या आंब्याची आवक सुरु झाली असली तरी आंबा खवय्यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या हापूस आंब्याची प्रतिक्षा असते.

Comments
Add Comment