अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि ११८ पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी उमेदवारांमध्ये उत्साह दिसून आला. सोमवारी तिसऱ्या दिवशी अलिबाग, खालापूर, रोहा, माणगाव या चार तालुक्यांतून उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर उर्वरित अकरा तालुक्यांतून एकही अर्ज दाखल झाला नाही. आतापर्यंत २३ अर्ज दाखल झाले.
जिल्हयातील सर्वच तालुक्यांतून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ८१६ व्यक्तींनी १५१६ कोरे उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील अलिबाग, खालापूर आणि माणगाव तालुक्यातून २३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज सादर केले. अलिबाग तालुक्यातील जि.प.साठी पाच अर्ज दाखल झाले असून, जिल्हा परिषदेच्या आवास मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप भोईर यांनी उमेदवरी अर्ज दाखल केला. जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाच्या चित्रा पाटील यांनी आंबेपूर मतदारसंघातून उमदेवार अर्ज दाखल केला. चेंढरे मतदरासंघातून आदिती नाईक, थळ मतदारसंघात मानसी महेंद्र दळवी, काविरमधून शिवसेनेचे अनंत गोंधळी यांनी अर्ज भरले. काविर गणातून शिवसेनेचे संतोष निगड यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून अलिबाग तालुक्यातील शहापूर, थळ आंबेपूर, आवास,, चेंढरे, कावीर या मतदारसंघांतून सहा, रोहा तालुक्यातील घोसाळे, माणगाव तालुक्यातून ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. १५ तालुक्यातील ५९ जिल्हा परिषद गटांसाठी ३४५ व्यक्तींनी ६३६ कोरे उमेदवारी अर्ज घेतले आहे. उरण तालुक्यातून सर्वाधिक कोरे अर्ज घेण्यात आले. जिल्हयात पंचायत समितीसाठी खालापूर तालुक्यातून दोन, अलिबागमधून दोन, माणगावमधून सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी ४७१ व्यक्तींनी ८८० कोरे उमेदवारी अर्ज घेतले आहे. पनवेल, पेण, रोहा, माणगाव येथून सर्वाधिक अर्ज घेण्यात आलेत.